कल्याण – डोंबिवली दि.22 ऑक्टोबर :
राज्य सरकारकडून राज्यातील कॉलेजेस पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून केडीएमसीतर्फे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी कोवीड लसीकरणाचे विशेष कॅम्प आयोजित करावे, अशी मागणी युवासेनेतर्फे करण्यात आली आहे. युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी यासंदर्भात केडीएमसीचे अतिरिक्त आयुक्त सुनील पवार यांची भेट घेत आपल्या मागणीचे निवेदन सादर केले. कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, युवासेना जिल्हाधिकारी दिपेश म्हात्रे यांच्या मार्गदर्शनानूसार आम्ही केडीएमसीला यासंदर्भात निवेदन सादर केल्याची माहिती युवासेनेचे उपजिल्हाधिकारी आशु सिंह यांनी दिली.
राज्यातील कोवीड रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात घट झाल्याने राज्यातील उद्योग व्यवसायांसोबतच शाळा आणि महाविद्यालयेही सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या सर्वांसाठी कोवीड लस घेतलेली असणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची आपल्याकडे असणारी मोठी संख्या पाहता त्यातील बहुतांश विद्यार्थ्यांनी अद्याप कोवीड लस घेतलेली नाहीये. एवढ्या मोठ्या प्रमाणात विद्यार्थी एकत्र येणार असल्याने त्यापूर्वी त्यांचे कोवीड लसीकरण होणे अत्यावश्यक आहे. त्यामूळे या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी केडीएमसीतर्फे विशेष लसीकरण कॅम्प आयोजित करण्याची मागणी युवसेनतेर्फे करण्यात आली आहे.
यावेळी उपजिल्हा युवा अधिकारी दुर्गेश चौहान, उपशहर युवा अधिकारी स्वप्नील सुभाष विटकर, उपशहर युवा अधिकारी रोशन पांडे, शाखा प्रमुख परेश म्हात्रे आदी पदाधिकारी उपस्थित होते.