डोंबिवली दि. 18 फेब्रुवारी :
चांगल्याला चांगले बोलले पाहीजे अशी आम्हाला राज ठाकरेंची शिकवण आहे. त्यामूळे एमआयडीसीतील रस्त्यांच्या कामांबाबत आपण अभिनंदनाचेही बॅनर नक्की लावणार अशी प्रतिक्रिया कल्याण ग्रामीणचे मनसे आमदार राजू पाटील यांनी दिली आहे. डोंबिवली एमआयडीसीतील रस्त्यांच्या काँक्रीटीकरण कामाचे भूमिपूजन गुरुवारी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना आमदार राजू पाटील यांनी ही प्रतिक्रिया दिली.
डोंबिवली एमआयडीसीतील रस्त्यांच्या कामांबाबत निधी मंजूर होऊनही काम सुरू होत नसल्याचे सांगत मनसे आमदार राजू पाटील यांनी काही महिन्यांपूर्वी शिवसेनेवर टिका केली होती. तसेच या रस्त्यांची काम सुरू झाल्यास आपण त्यांच्या अभिनंदनाचेही बॅनर लावू असे मत व्यक्त केले होते. काल डोंबिवलीत झालेक्या भूमीपूजन सोहळ्यातील भाषणादरम्यान पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आमदार राजू पाटील यांना याबाबत आठवण करून दिली.
त्यावर प्रसिद्धी माध्यमांना प्रतिक्रिया देताना आमदार राजू पाटील यांनी सांगितले की 100 टक्के आपण बॅनर लावणार, चांगले काम केले तर त्याला चांगले बोलायला काय हरकत आहे. आम्ही सक्षम विरोधक आहोत. सत्ताधाऱ्यांवर दबाव टाकून काम करुन घेणे हे आमचे काम आहे. हा लोकांचा विजय असून या रस्त्याची कामं सुरु झाल्यावर आपण अभिनंदनाचेही बॅनर लावणार असे सांगत त्यात आपल्याला कोणत्याही प्रकारचा कमीपणा वाटत नसल्याची प्रांजळ कबुलीही आमदार पाटील यांनी दिली.