कल्याण डोंबिवलीत मनसेच्या 50 हून अधिक पदाधिकारी – कार्यकर्त्यांना पोलिसांची नोटीस
कल्याण-डोंबिवली दि. 4 मे :
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्यायाबाबत दिलेल्या अल्टीमेटमच्या पार्श्वभूमीवर कल्याणात आज काळी मशिदीत भोंग्याविनाच पहाटेची अजान झाल्याचे दिसून आले. तर पोलीस प्रशासनाकडून मनसेसह सर्वच नागरिकांना शांततेचे आवाहन करण्यात आले आहे. तर कल्याण डोंबिवलीतील मनसेच्या 50 हून अधिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना नोटीसा बजावल्या आहेत. ज्यामध्ये मनसे नेते आणि आमदार राजू पाटील यांचाही समावेश आहे.
गुढीपाडव्याच्या तसेच औरंगाबाद येथे नुकत्याच झालेल्या सभेमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्याविरोधात आक्रमक पवित्रा घेत हनुमान चालीसा लावण्याचे मनसैनिकांना आवाहन करत राज्य सरकारला 3 मे पर्यंतचे अल्टीमेटम दिले होते. त्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यात पोलिसांकडून मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. तर खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी मनसेच्या काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे. तसेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या इशाऱ्यानंतर कल्याणातील मंदिर आणि मशिद परिसरात काल रात्रीपासूनच पोलिसांनी तगडा बंदोबस्त तैनात केला आहे.
कल्याणात अजान भोंग्याविना…
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने कल्याणातील मशिदीच्या ट्रस्टीची बैठक घेत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्याचे आवाहन केले होते. त्यावेळी सर्वोच्च न्यायालयाच्या या आदेशाचे पालन करण्याचे आश्वासन या मशिदीच्या ट्रस्टीनी दिल्याची माहिती महात्मा फुले पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होनमाने यांनी दिली. त्यानुसार कल्याणच्या विविध मशिदीत आज पहाटे लाऊडस्पीकर विना अजान पठण झाल्याचे दिसून आले. दरम्यान सध्या निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मनसेसह सर्वच नागरिकांना शांततेचे आवाहन केले आहे.
दरम्यान केवळ आजच पहाटे लाऊड स्पीकर न लावता अजान पठण झाल्याच्या वृत्ताचे एस एम गोठडा यांनी खंडन केले. आज पहाटेच्या अजानचा काही प्रश्नच नाही. दररोज सकाळी सहा वाजण्याच्या अगोदर कल्याणातील कोणत्याही मशिदीत लाऊडस्पीकरद्वारे अजान पठण केली जात नसल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच सर्वच मशिदींमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले जात असल्याचेही गोठडा यांनी स्पष्ट केले.