कल्याण यार्ड रिमॉडेलिंग प्रकल्पालाही मिळणार गती
कल्याण दि.२ जून :
कल्याण रेल्वे स्थानकातून कल्याण पूर्व भागाला जोडणाऱ्या लोकग्राम पादचारी पुलाचे काम येत्या काही दिवसात सुरू होणार आहे. फेब्रुवारी महिन्यात या कामाची निविदा जाहीर करण्यात आली होती. ही सर्व निविदा प्रक्रिया पूर्ण करत लवकरच या कामाचे कार्यादेश दिले जाणार असून लोकग्रामच्या पादचारी पुलाचे काम मार्गी लागणार असल्याची माहिती खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली. (With the completion of the tender process, the way to Lokgram pedestrian bridge was cleared)
फेब्रुवारी महिन्यात लोकग्राम पुलाच्या कामासाठी निविदा जाहीर करण्यात आल्या होत्या. ही निविदा प्रक्रिया नुकतीच पूर्ण झाली असून लवकरच लोकग्राम पादचारी पुलाचे कार्यादेश कंत्राटदार कंपनीला दिले जाणार आहेत. त्यामुळे लोकग्राम पुलाचे काम लवकरच सुरु होणार असल्याची माहिती खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी दिली आहे.
कल्याण हे मध्य रेल्वेवरील सर्वाधिक वर्दळीचे रेल्वे स्थानक आहे. विविध एक्सप्रेस, मेल आणि लोकल गाड्या कल्याण स्थानकातून ये-जा करत असतात. त्यामुळे गेल्या काही वर्षांत कल्याण रेल्वे स्थानकावर प्रवाशांची संख्या वाढली आहे. परिणामी रेल्वे स्थानकावर त्याचा भार पडतो आहे. येथील व्यवस्था आणि मार्गिका कमी पडू लागल्याने त्याचा फटका रेल्वे वाहतुकीला बसतो. त्यामुळे कल्याण रेल्वे स्थानकाचे विस्तारीकरण करत प्रवाशांना अत्याधुनिक सुविधा द्याव्या, यासाठी कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे प्रयत्नशील आहेत.
त्यांच्या माध्यमातून कल्याण रेल्वे स्थानक रीमॉडेलिंग प्रकल्पालाही ४ वर्षांपूर्वी मंजुरी देण्यात आली असून ८०० कोटींचा खर्च असलेल्या या प्रकल्पाच्या कामाचे दोन टप्प्यात विभाजन करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात मालवाहतूक यार्ड रीमॉडेलिंगच्या कामाचा समावेश असून दुसऱ्या टप्प्यात प्रवासी वाहतुकीसाठी महत्त्वाच्या असलेल्या स्थानकाचा पुनर्विकास केला जाणार आहे. हा प्रकल्प सुरू असतानाच कल्याण पूर्व भागाला कल्याण स्थानकाशी जोडण्यासाठी आणि पादचाऱ्यांसाठी महत्त्वाच्या असलेल्या लोकग्राम पुलाचेही काम हाती घेण्यात आले होते.