कल्याण डोंबिवली दि.३ नोव्हेंबर :
गेल्या आठवड्यापासून कल्याण डोंबिवलीसह आसपासच्या परिसरात अतिशय आल्हाददायक असे वातावरण निर्माण झाले असून मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडणारे नागरिकही गुलाबी थंडीच्या चाहुलीने सुखावले आहेत.
काहीशा उशिराने सुरू झालेल्या मात्र थेट दिवाळीच्या पहिल्या दिवसापर्यंत लांबलेल्या पावसाने यंदा थंडीच्या आगमनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. परंतू ऋतूराजांनी सर्वानाच सुखद असा धक्का देत दिवाळी संपेपर्यंत आपल्या सर्वांनाच आल्हाददायक वातावरणाचे दिवाळी गिफ्ट दिले. साधारणपणे गेल्या सोमवारची (२४ ऑक्टोबर) दिवाळीतील सकाळ उगवली तीच गारेगार वातावरणात. अभ्यंगस्नान करून दिवाळी पहाटसाठी घराबाहेर पडलेल्या अनेकांना हा सुखद धक्का अनुभवायला मिळाला. त्याला आता आठवडा लोटून गेला असला तरी सकाळच्या वातावरणातील गारवा तसाच असल्याने सर्वच जण खुश झाले आहेत.
परिणामी कल्याण आणि डोंबिवलीसह आसपासच्या किमान तापमानात चांगलीच घट होऊन तापमानाचा पारा थेट १७ अंशांपर्यंत खाली आला आहे. तर इथल्या कमाल तापमानामध्ये जवळपास दुपटीने वाढ (३५ अंश) झाली असली तरी सकाळच्या आल्हाददायक वातावरणापुढे त्याचं फारसे काही चालताना दिसत नाहीये. हे विशेष.
उत्तर /पूर्वकडून येणाऱ्या कोरडा वारा- स्वच्छ आकाशामुळे गारवा – हवामान अभ्यासक अभिजीत मोडक
गेल्या आठवड्यात २३ ऑक्टोबरला आपल्याकडून मॉन्सूनने निरोप घेताच ही गुलाबी थंडीची चाहूल जाणवू लागली आहे. तसेच उत्तर/पूर्व कडून कोरड्या वारा आणि स्वच्छ आकाशामुळे आपल्याला हा गारवा अनुभवायला मिळत आहे. सध्या तरी यंदाच्या आठवड्या अखेरपर्यंत अशीच परिस्थिती राहू शकेल अशी माहिती हवामान अभ्यासक अभिजीत मोडक यांनी एलएनएनशी बोलताना दिली.
तर अंतर्गत कोकण जे पश्चिम घाटापासून जवळ परिसरात तापमान १६ ते १८°C सेल्सियसपर्यंत खाली येऊ शकते. तर किनारी भागात हेच तापमान १८-२० अंशापर्यंत राहू शकेल. मात्र पूर्वेकडील याच कोरड्या वाऱ्यामुळे या आठवड्यात दुपारच्या सुमारास तापमान हे चढे म्हणजे ३५° अंश सेल्सिअसच्या वर जाऊ शकते असा अंदाजही मोडक यांनी व्यक्त केला आहे.
तर पुढच्या आठवड्यात हवेची दिशा आणि ढगाळ वातावरण अशी परिस्थिती निर्माण झाल्यास पहाटेचे किमान तापमान पुन्हा थोडेसे वाढून थंडीचे प्रमाण कमी होण्याची शक्यताही त्यांनी यावेळी सांगितली.