
कल्याणात झाली जाहीर सभा
कल्याण दि.15 नोव्हेंबर :
गेली 5 वर्षे आपण सर्वांनी महाराष्ट्राचा तमाशा बघितला आहे. या लोकांनी करून ठेवलेल्या चिखलातून आपल्याला महाराष्ट्र बाहेर काढायचा आहे. त्यासाठी कल्याण पश्चिमेतील उल्हास भोईर यांच्यासह राज्यातील सर्ग मनसे उमेदवारांना बहुमताने विजयी करण्याचे आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कल्याणात केले. कल्याणातील स्व. यशवंतराव चव्हाण क्रीडांगण येथे मनसे उमेदवार उल्हास भोईर यांच्या प्रचारासाठी झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते.
आपल्यामध्ये काही मतभेद असतील तर ते गाडून टाका, कारण त्यांच्यातील मतभेदांपेक्षा हा महाराष्ट मोठा आहे. हा महाराष्ट्र आपल्याला ठीकठाक करायचा असेल तर महाराष्ट्रातील सर्व मनसे उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करा. 20 तारीख अत्यंत महत्वाची असून आपण सर्वांनी अजिबात गाफील न राहण्याचे आवाहनही राज ठाकरे यांनी यावेळी केले. तर प्रकृती अस्वास्थ्यामुळे राज ठाकरे यांनी आपले भाषण आटोपते घेत पुढील जाहीर सभेसाठी रवाना झाले.
तर आपण आपल्या नगरसेवकपदाच्या कार्यकाळात तब्बल 70 ते 80 कोटींची विकासकामे मतदारसंघात केली आहेत. त्याचा विचार करता आपण सर्वांनी मला विधानसभेवर निवडून पाठवल्यास आपण या शहरासाठी आणखी जोमाने काम करू असे आश्वासन कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातील मनसे उमेदवार उल्हास भोईर यांनी यावेळी केले.
या जाहीर सभेला यावेळी मनसेचे सरचिटणीस माजी आमदार प्रकाश भोईर, कौस्तुभ देसाई, नयना भोईर, कस्तुरी देसाई, चेतना रामचंद्रन, ऊर्मिला तांबे, विनोद केणे यांच्यासह मनसेचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.