Home ठळक बातम्या 27 गावांतील सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रश्नी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेणार – खासदार डॉ. श्रीकांत...

27 गावांतील सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रश्नी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेणार – खासदार डॉ. श्रीकांत शिंदे

सफाई कर्मचाऱ्यांचे दोन दिवसांपासून सुरू कामबंद आंदोलन

कल्याण दि.13 ऑगस्ट :
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या 27 गावांतील सफाई कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी कालपासून काम बंद आंदोलन सुरू केले आहे. या सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांबाबत लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक घेऊन प्रश्न सोडविणार असे आश्वासन कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिले आहे. केडीएमसी मुख्यालयासमोर आंदोलनास बसलेल्या या कर्मचाऱ्यांची खा. डॉ. शिंदे यांनी भेट घेत पुन्हा कामावर रुजू होण्याचे आवाहन केले.(will-hold-a-meeting-with-the-chief-minister-regarding-the-question-of-sanitation-workers-in-27-villages-mp-dr-shrikant-shinde)

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये समावेश होऊनही महानगरपालिकेच्या नियमानुसार पगार मिळावा या प्रमुख मागणीसाठी 27 गावातील सफाई कामगारांनी कामबंद आंदोलन सुरू केले आहे. केडीएमसी मुख्यालयासमोर हे सफाई कामगार केडीएमसी प्रशासनाविरोधात निदर्शने करत असून या कामगारांची खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आज भेट घेतली.

27 गावांतील मुख्य प्रश्न सोडवले, कामगारांचा प्रश्नही नक्कीच सोडवू – खा.डॉ. श्रीकांत शिंदे
यापूर्वी 27 गावांना भेडसावणारे मोठे प्रश्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या पुढाकाराने सोडवण्यात आले आहेत. मग त्यात कर आकारणीचा प्रश्न असो की पाणी पुरवठ्याचा, हे दोन्ही प्रश्न आपण यशस्वीरीत्या सोडवले आहेत. त्याचप्रमाणे 27 गावांतील सफाई कर्मचाऱ्यांचा पगारासंदर्भात आपण येत्या काही दिवसांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमवेत बैठक आयोजित करण्यासाठी पुढाकार घेऊ. आणि या बैठकीत याप्रश्नी नक्कीच समाधानकारक असा तोडगा निघेल असा विश्वास खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला. तसेच सुरू केलेले हे कामबंद आंदोलन मागे घेत कामावरही रुजू होण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

यावेळी खा.डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यासोबत स्थानिक आमदार विश्वनाथ भोईर, जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, अरविंद मोरे, शहरप्रमुख रवी पाटील, राजेश मोरे, महेश पाटील, महेश गायकवाड, युवासेना सचिव दिपेश म्हात्रे, निलेश शिंदे, संजय पाटील, छायाताई वाघमारे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा