डोंबिवली दि.29 ऑक्टोबर :
डोंबिवली फर्स्ट’ या तत्त्वाने डोंबिवली शहर आणि डोंबिवलीकरांसाठी प्रयत्न करत आलोय. यापुढेही हे प्रयत्न असेच अविरत सुरू राहतील अशा शब्दांत सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. डोंबिवली विधानसभा मतदारसंघासाठी महायुतीचे उमेदवार म्हणून रविंद्र चव्हाण यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर प्रसिध्दी माध्यमांशी बोलताना त्यांनी ही भावना व्यक्त केली.
डोंबिवली पश्चिमेच्या सम्राट चौकातून निघालेल्या भव्य मिरवणूकीच्या माध्यमातून यावेळी चव्हाण यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केलेलं पाहायला मिळाले. ज्यामध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते जगन्नाथ पाटील, आमदार किसन कथोरे, माजी नगरसेवक मंदार हळबे, राहुल दामले, शैलेश धात्रक, मनीषा धात्रक, शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक विश्वनाथ राणे यांच्यासह महायुतीच्या घटक पक्षातील राजकीय पक्षांचे प्रतिनिधीही उपस्थित होते.
डोंबिवलीकरांचा आशीर्वाद आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या साथीने डोंबिवली विधानसभा मतदारसंघातून मतदार आपल्याला पुन्हा एकदा संधी देतील असा विश्वास चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केला.