Home ठळक बातम्या डायघर येथील वन्यप्राणी रूग्णालय तथा पुनर्वसन केंद्राचे खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या...

डायघर येथील वन्यप्राणी रूग्णालय तथा पुनर्वसन केंद्राचे खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण

ठाणे दि.3 ऑगस्ट :
डायघर येथे महाराष्ट्र शासनाच्या वनविभागातर्फे नव्याने सुरु करण्यात आलेल्या वन्यप्राणी रूग्णालय तथा पुनर्वसन केंद्राचे कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. या केंद्रामुळे उपचारानंतर पूर्णपणे बरे होण्यासाठी प्राण्यांना एक सुरक्षित निवाराही उपलब्ध झाला आहे. तर याठिकाणी देशातील उत्तम दर्जाचे असे स्टेट ऑफ दि आर्ट असे प्राणिसंग्रहालय, बचाव आणि पुनर्वसन केंद्राची उभारणी करण्यात यावी, यासाठी सविस्तर प्रकल्प आराखडा तयार करून तो लवकरात लवकर सादर करावा. यासाठी गरज पडल्यास १०० कोटी रुपयांच्या भरीव निधीची तरतुद केंद्र, राज्य सरकार तसेच जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून तातडीने करण्यात येईल. असे आश्वासन खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना दिले. ( Wildlife Hospital and Rehabilitation Center Dayghar Launched by MP Dr Shrikant Shinde)

म्हणून उभारण्यात आलेय हे केंद्र…
ठाण्यातील डायघर येथे महाराष्ट्र शासनाच्या वन विभागातर्फे वन्यप्राणी रूग्णालय तथा पुनर्वसन केंद्र उभारण्यात आले आहे. या केंद्रात वन्य प्राण्यांवर उपचार करण्यासाठी सर्व आवश्यक सोयीसुविधा उभारण्यात आले आहे. तसेच जखमी प्राण्यांच्या शस्त्रक्रियेसाठी देखील सुविधा या ठिकाणी उभारण्यात आल्या आहेत. वाहनांच्या धडकेत, नैसर्गिक आपत्तीमुळे, विजेचा झटका लागून तसेच काही संरक्षित वनक्षेत्रात घुसखोरी करून वन्यप्राण्यांना तसेच पक्षांना इजा करणाऱ्या काही समाज कंटकांमुळे वन्यजीव अनेकदा जखमी होत असल्याचे निदर्शनास येत असते. या प्राण्यांना तातडीने उपचार न मिळाल्यास त्यांचा मृत्यू होतो. तर काहीना कायमचे अपंगत्व येते. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाच्या वन विभागातर्फे वन्यप्राणी रूग्णालय तथा पुनर्वसन केंद्र उभारण्यात आले आहे.

प्राण्यांना एक सुरक्षित निवारा उपलब्ध झालाय..
या केंद्रामुळे केवळ ठाणे, कल्याण, डोंबिवली येथीलच नव्हे तर संपूर्ण ठाणे जिल्ह्यातील वन्य प्राण्यांवर उपचार करणे सुकर होणार आहे. तसेच या ठिकाणी उपचारानंतर प्राण्यांना सुरक्षित पद्धतीने ठेवण्यासाठी पिंजऱ्यांची देखील उभारणी करण्यात आली आहे. यामुळे उपचारानंतर पूर्णपणे बरे होण्यासाठी प्राण्यांना एक सुरक्षित निवारा देखील उपलब्ध झाला आहे. शहरात आढळून येणाऱ्या बिबट्याना जेरबंद करून त्यांना सुरक्षित ठिकाण मिळेपर्यंत काही काळ या केंद्रात ठेवण्यासाठी विशेष पिंजरेही या केंद्रात उभारण्यात आले आहेत. तसेच शस्त्रक्रियेसाठी आणि उपचारांसाठी आधुनिक यंत्रसामग्री, प्रशिक्षित वैद्यकीय कमर्चारी डॉक्टर यांची नियुक्ती या ठिकाणी करण्यात आली आहे. यामुळे उपचारानंतर पूर्णपणे बरे होण्यासाठी प्राण्यांना एक सुरक्षित निवारा देखील उपलब्ध झाला आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या हस्ते याचे शनिवारी लोकार्पण करण्यात आले. या केंद्राच्या लोकार्पणानंतर सर्व प्राणीप्रेमीकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

स्टेट ऑफ आर्ट प्राणिसंग्रहालय, बचाव आणि पुनर्वसन केंद्र उभारा…
या ठिकाणी हे रुग्णालय सुरू झाले ही अतिशय उत्तम बाब आहे. मात्र याठिकाणी राज्यातीलच नव्हे तर देशातील उत्तम दर्जाचे असे स्टेट ऑफ आर्ट असलेले प्राणिसंग्रहालय, बचाव आणि पुनर्वसन केंद्राची उभारणी करण्याच्या सूचना वनविभागासह इतर संबंधित विभागांना खासदार डॉ. शिंदे यांनी दिल्या. परेल येथील शासकीय वन्यप्राणी रुग्णालयाच्या धर्तीवर या रुग्णालयाची आणि भायखळा येथे असलेल्या प्राणिसंग्रहालयाच्या धर्तीवर बचाव आणि पुनर्वसन केंद्राची उभारणी करण्यात यावी. यासाठी सविस्तर प्रकल्प आराखडा तयार करून तो लवकरात लवकर सादर करावा. यासाठी गरज पडल्यास १०० कोटी रुपयांच्या भरीव निधीची तरतुद केंद्र, राज्य सरकार तसेच जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून तातडीने करण्यात येईल. यामुळे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आणि मुंबईतील इतर केंद्रांवर अवलंबून राहण्याची गरज भासणार नाही, असे यावेळी खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी सांगितले.

यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे, उपजिल्हा प्रमुख राजेश कदम, डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे, दिवा शहरप्रमुख रमाकांत मढवी, मुंब्रा शहरप्रमुख राजन किणे, कल्याण ग्रामीण तालुकाप्रमुख महेश पाटील, आगरी युथ फोरमचे अध्यक्ष गुलाब वझे, बंडू पाटील, हनुमान ठोंबरे यांच्यासह ठाणे मुख्य वनसंरक्षक के. प्रदीपा, सहायक वनसंरक्षक सोनल वळवी, उप वनसंरक्षक संतोष सस्ते, वनपरिक्षेत्र अधिकारी दिनेश देसले तसेच नव्याने सुरु करण्यात आलेल्या रुग्णालयाचे डॉ. मंदार गावकर यांच्यासह शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विविध मान्यवर मंडळी उपस्थित होते.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा