Home ठळक बातम्या रस्त्यांवरून, खड्ड्यांतून उडणाऱ्या धुळीसाठी केडीएमसीला कोण दंड करणार – जागरूक नागरिकांचा सवाल

रस्त्यांवरून, खड्ड्यांतून उडणाऱ्या धुळीसाठी केडीएमसीला कोण दंड करणार – जागरूक नागरिकांचा सवाल

…तर धूळ प्रदूषण रोखण्यासाठी राबवतोय अनेक उपाययोजना – केडीएमसीचे स्पष्टीकरण

कल्याण डोंबिवली दि.3 जानेवारी :
गेल्या काही दिवसांपासून एम एम आर रिजनमध्ये वायू प्रदूषणाचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. हायकोर्टाच्या निर्देशानंतर इतर महापालिकांप्रमाणे केडीएमसीनेही बांधकाम व्यावसायिकांना दंड ठोठावण्यासह काही उपाययोजना लागू केल्या आहेत. मात्र कल्याणातील काही जागरूक नागरिकांनी केडीएमसीच्या या भूमिकेवर बोट ठेवत रस्त्यांवरून, खड्ड्यांतून उडणाऱ्या धुळीसाठी केडीएमसीला कोण दंड करणार असा प्रश्न उपस्थित केला आहे. त्यावर हे धूळ प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेकडून विविध उपाययोजना राबवण्यात येत असल्याची प्रतिक्रिया केडीएमसी प्रशासनाकडून देण्यात आली आहे. (Who will fine KDMC for dust flying from roads, pits – Question of conscious citizens)

मुंबईसह एमएमआर रिजनमधील इतर शहरांमध्ये वायू प्रदूषणाचा आलेख वाढतच चालला आहे. त्यातही हवेतील धुलीकणांचा समावेश आणि त्यामुळे नागरिकांना उद्भवणाऱ्या आरोग्याच्या समस्या पाहता त्यावर तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश न्यायालयाकडून महापालिका प्रशासनाला देण्यात आले आहेत. त्या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवली महापालिकेनेही हे वायू प्रदूषण कमी करण्यासाठी विविध उपाय योजना राबवत प्रदूषण वाढीसाठी जबाबदार आसलेल्या घटकांना कायदेशीर दंडात्मक कारवाईचा इशारा दिला आहे. त्यानुसार वायू प्रदूषणात भर टाकणाऱ्या आणि केडीएमसी प्रशासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन न करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांना नोटीसा बजावल्या आहेत.

त्याचा दाखला देत काही जागरूक नागरिकांनी केडीएमसी प्रशासनाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करत शहरातील रस्त्यांवरून उडणारी, रस्त्यावरील खड्ड्यांतून उडणारी धूळ हवेत जात असल्याबद्दल केडीएमसी प्रशासनाला कोण दंड ठोठावणार असा प्रश्न उपस्थित केला आहे. तसेच कल्याण पश्चिमेतील रस्त्यांवर धूळ पसरली असून गोविंदवाडी बायपासवर तर धुळीचे मोठे थर साचले असल्याचे सांगितले. तर संदीप हॉटेल येथून छत्री बंगल्याकडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्यावरूनही वाहनांच्या वर्दळीमुळे मोठ्या प्रमाणात धूळ उडत असल्याचे या नागरिकांनी निदर्शनास आणून दिले आहे. आधी केडीएमसी प्रशासनाने स्वतः नियमांचे पालन करावे आणि नंतर मग नागरिकांना सांगावे अशा शब्दांत त्यांनी केडीएमसी प्रशासनावर टिका केली आहे.

धूळ प्रदूषण रोखण्यासाठी राबवतोय विविध उपाययोजना – अनिता परदेशी, शहर अभियंता, केडीएमसी

जागरूक नागरिकांच्या या आरोपानंतर केडीएमसी प्रशासनाची भूमिका जाणून घेतली असता शहरातील धुळीमुळे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी आम्ही विविध उपाययोजना राबवत असल्याची प्रतिक्रिया शहर अभियंता अनिता परदेशी यांनी दिली आहे. गेल्या महिन्याभरापासून शहरातील प्रमुख आणि अंतर्गत रस्त्यांवर रात्रीच्या वेळी प्रभगनिहाय 4 पॉवर स्वीपर आणि 200 सफाई कर्मचाऱ्यांकडून विशेष धूळ स्वच्छ्ता अभियान राबविण्यात येत असून त्यासोबतच कल्याण डोंबिवलीतील 60,80 आणि 100 फुटी रस्त्यांवर फॉगर मशीनद्वारे पाण्याचा फवारा सोडला जात असल्याचेही त्यांनी सांगितले. याशिवाय येत्या काही दिवसांत एअर प्यूरीफिकेशन यंत्रणा, मिस्ट बेस्ड फाऊंटन यंत्रणाही कल्याण डोंबिवलीत कार्यान्वित केली जाणार असल्याचे सांगत वायूप्रदूषण कमी करण्यासाठी महापालिका प्रशासन गंभीरपणे प्रयत्न करीत असल्याचेही शहर अभियंता अनिता परदेशी यांनी स्पष्ट केले आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा