कल्याण-डोंबिवली दि.20 एप्रिल :
मुंबई आणि पुण्यात महापौर, पालकमंत्री आणि आयुक्त एकत्रित येऊन बैठका घेतात. केडीएमसीत प्रशासक म्हणून आयुक्त आहेत. महापौर नाही. मात्र, पालकमंत्री कुठे आहेत? असा सवाल मनसे आमदार राजू पाटील यांनी उपस्थित केला. आमदार राजू पाटील यांनी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांची भेट घेतल्यानंतर प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधताना हा प्रश्न उपस्थित केला.
कल्याण डोंबिवली महापालिकेत कोरोना रुग्णांची संख्या एक लाखाच्या पार गेली आहे. या पार्श्वभूमीवर चर्चा करण्यासाठी आमदार राजू पाटील, डोंबिवली शहराध्यक्ष मनोज घरत यांनी केडीएमसी केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी भेट घेत काही सूचना केल्या. लसीकरण काही केंद्रांवर सुरु आहे. मात्र लसीचे डोस कमी प्राप्त होतात. तेव्हा आधी केंद्रे जास्त उभारा. डोस प्राप्त झाल्यावर लसीकरण थांबणार नाही, अशी सूचनाही त्यांनी केली. तर डोंबिवलीत दोन ठिकाणी स्मशानभूमीची जागा उपलब्ध करुन काम लवकरात लवकर सुरु करण्याची मागणीही आमदार राजू पाटील यांनी केली.
तर मुंबई आणि पुण्यात महापौर, पालकमंत्री आणि आयुक्त एकत्रित येऊन बैठका घेतात. त्याप्रमाणे पालकमंत्र्यांनीही आढावा बैठक घेण्याची गरज आमदार राजू पाटील यांनी व्यक्त केली आहे.