डोंबिवलीमध्ये राजू पाटील यांच्या प्रचारासाठी झालेल्या सभेमध्ये ओढले आसूड
डोंबिवली दि.4 नोव्हेंबर :
शिवसेना असू देत, राष्ट्रवादी असू दे, भाजप असु दे, मनसे असू दे की कोणताही राजकीय पक्ष. या सगळ्यांपेक्षा महाराष्ट्र मोठा असून कोणताही पक्ष टिकला नाही टिकला हे महत्त्वाचे नाही. महाराष्ट्र टिकला पाहिजे, आताच्या या घाणेरड्या राजकारणापासून महाराष्ट्राला वाचवणे गरजेचे सांगत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यातील राजकीय परिस्थितीवर आसूड ओढले. डोंबिवलीच्या पी अँड टी कॉलनी येथे मनसेचे कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील उमेदवार राजू पाटील यांच्या प्रचारासाठी झालेल्या जाहीर सभेमध्ये ते बोलत होते.
एका मुख्यमंत्र्यांच्या राजकीय कार्यक्रमाच्या स्टेजवर लोकांची करमणूक म्हणून एका भोजपुरी महिलेने नृत्य केल्याच्या प्रकाराबद्दल संताप व्यक्त करताना राज ठाकरे यांनी सांगितले की ज्या महाराष्ट्राने अटकेपार झेंडे रोवले, ज्या महाराष्ट्राकडे एक सुसंस्कृत महाराष्ट्र म्हणून पाहिले जायचे त्याच महाराष्ट्रात असली दशा ? या गोष्टी तर उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये होत असल्याचे सांगत हीच का लाडकी बहीण योजना असा संतप्त सवाल उपस्थित करत एकनाथ शिंदे यांनी या प्रकराकडे वैयक्तिक लक्ष घालण्याची सूचना केली. तसेच आपण आज केवळ आपल्याशी संवाद साधायला आलो असून पुन्हा 15 नोव्हेंबरला याच ठिकाणी येणार असल्याचे सांगितले.
तर कल्याण ग्रामीणचे मनसे आमदार आणि उमेदवार राजू पाटील यांनी आपल्या भाषणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या कार्यपद्धतीवर तुफान हल्ला चढवला. तसेच लोकसभा निवडणुकीला आपण केवळ राज ठाकरे यांनी आपल्याला सांगितल्यामुळेच खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना मदत केली असा गौप्यस्फोट केला.
यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईर, डोंबिवली शहरध्यक्ष राहुल कामत, कल्याण पश्चिमचे उमेदवार उल्हास भोईर यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.