कोवीड सेंटरच्या उभारणीतही कोट्यवधींचा भ्रष्टाचाराचा आरोप
डोंबिवली दि.17 जानेवारी :
कल्याण डोंबिवलीतील सार्वजनिक आरोग्य सेवांकडे सत्ताधारी गांभिर्याने केव्हा पाहणार असा संतप्त सवाल करत आमदार पाटील यांनी कोवीड सेंटरच्या उभारणीत कोट्यवधींच्या भ्रष्टाचार झाल्याचा मुद्दाही उपस्थित केला आहे. डोंबिवलीच्या शास्त्रीनगर रुग्णालयातील प्रतिक्षा कक्षाच्या दुरावस्थेवरून आमदार राजू पाटील यांनी सत्ताधाऱ्यांवर हा हल्लाबोल केला आहे.
एकीकडे कोविडविरोधातील लसीकरण सुरू झाल्याचा आनंद साजरा होत असताना शास्त्रीनगर रुग्णालयाची दुरावस्था बघून आपल्याला खूप वाईट वाटल्याचे सांगत “यांना अजूनही अकला आलेल्या नाहीत का?, यांची कातडी एवढी गेंड्यासारखी जाड झाली आहे का? की लोकांसाठी आरोग्य सेवा किती महत्वाची आहे याचेही गांभिर्य कधी येणार आहे असा संतप्त सवाल आमदार राजू पाटील यांनी उपस्थित केला आहे.
तसेच कोरोना कमी होत असल्याने तात्पुरते उभे केलेले कोवीड सेंटर बंद करत असतानाच दुसरीकडे नविन कोवीड सेंटरचे उद्घाटन कशासाठी केले जात होते? याऐवजी इथल्या करदात्या नागरिकांचा पैसा पालिकेच्या दवाखान्यांवर खर्च करा आणि ते सुसज्ज करा असे आम्ही वारंवार सांगत होतो. परंतु तसे न करता सत्ताधारी आणि प्रशासनाने मनमानी केल्याचा आरोप आमदार पाटील यांनी केला. त्यामूळेच कोवीड सेंटर उभारणीमध्ये कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केला गेल्याच्या चर्चा आता खऱ्या वाटू लागल्याचेही आमदार राजू पाटील यांनी यावेळी सांगितले. तर कोवीडसाठी 100 कोटी खर्च करणाऱ्या केडीएमसीच्या मालकीच्या डोंबिवलीतील सुपरस्पेशालिटी दवाखान्यातील प्रतिक्षा कक्षाची अवस्था बघून ‘हम होंगे कामयाब’? कसे काय होणार असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.