Home ठळक बातम्या क्या बात है: शहर सौंदर्यीकरणासाठी आता नागरिकांचाही पुढाकार

क्या बात है: शहर सौंदर्यीकरणासाठी आता नागरिकांचाही पुढाकार

 

कल्याण दि.18 जानेवारी :
कल्याण डोंबिवलीला लागलेला गलिच्छपणाचा डाग पुसण्यासाठी प्रशासन आपल्या परीने प्रयत्नशील असताना आता शहरातील नागरिकदेखील ही शहरं सुंदर करण्यासाठी पुढे सरसावले आहेत. कल्याण पश्चिमेच्या एका रस्त्यावरील दुभाजकाचे करण्यात आलेले सुशोभीकरण हे नागरिकांच्या या पुढाकाराचा उत्तम नमुना ठरत आहे.

कल्याण आणि डोंबिवली शहरं. एक शहर ऐतिहासिक काळातील घटनांचे साक्षीदार तर दुसरे राज्याच्या सांस्कृतिक चळवळीच्या मुहूर्तमेढीचे. मात्र इतकी मोठी सोनेरी कडा असतानाही या शहरांच्या विकासासोबतच त्यांच्या सौंदर्यीकरणाकडे मात्र गेल्या 2 दशकांत अक्षम्य असे दुर्लक्ष झाले. परिणामी ऐतिहासिक, सांस्कृतिक वारसा लाभलेल्या या शहरांचा चेहरा काळवंडून गेला. ज्यामुळे वर्षानुवर्षे या शहरांत राहणाऱ्या नागरिकांच्या मनात शहराविषयीची आस्था, आपलेपणाही आटत गेला होता.

मात्र गेल्या 2-3 वर्षांत कल्याण डोंबिवली शहरांवरील हा अस्वच्छतेचा डाग पुसण्यासाठी केडीएमसी प्रशासनाकडून झालेले प्रयत्न नक्कीच वाखाणण्याजोगे आहेत. तर नागरिकांच्या मनामध्ये आपल्या शहराविषयी आस्था-आपुलकी असेल तर कशाप्रकारे शहराच्या सौंदर्यामध्ये खारीचा वाटा उचलू शकतो याचे उत्तम उदाहरण कल्याण पश्चिमेतील हा रस्ता ठरला आहे.

कल्याणातील नामांकित डॉक्टर अश्विन कक्कर यांनी सिंडिकेट येथील राणी लक्ष्मीबाई उद्यानाशेजारील (कमिश्नर बंगल्यासमोरील) रस्त्यावर असणाऱ्या दुभाजकाचा केलेला कायापालट हा सर्वांच्याच कौतुकाचा विषय ठरत आहे. या दुभाजकामध्ये असणाऱ्या झाडांवर डॉ. कक्कर यांनी स्वखर्चाने सुंदर अशी चित्रं काढून घेतली आहेत. तसेच त्यांच्याभोवती अत्यंत आकर्षक आणि नयनरम्य रोषणाई केली आहे. ज्यामुळे हा दुभाजक लोकांच्या पसंतीस उतरत आहे. विशेषतः संध्याकाळच्या वेळेला तर इथल्या दुभाजकावरील सौंदर्यीकरणाचा नजारा अजूनच उठून दिसते. जो आपल्या मोबाईलमध्ये कैद करण्यासाठी दररोज नागरिकांची मोठी गर्दी होत असते.

डॉ. अश्विन कक्कर यांनी एक नागरिक म्हणून शहराच्या सौंदर्यीकरणासाठी घेतलेला हा पुढाकार निश्चितच कौतुकास्पद असून इतर नागरिकांनीही आपापल्या परीने ही दोन्ही शहरं सुंदर दिसण्यासाठी आणि राहण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. तरच या शहरांवरील अस्वच्छतेचा डाग पुसला जाण्यासह लोकांच्या मनातही आपण राहत असलेल्या शहरांबद्दल नक्कीच आपुलकीचा ओलावा झिरपू लागेल.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा