Home ठळक बातम्या “काय हवंय…?” कल्याण पुर्वेत सुरू झालीय “त्या” बॅनरची चर्चा

“काय हवंय…?” कल्याण पुर्वेत सुरू झालीय “त्या” बॅनरची चर्चा

कल्याण दि.4 ऑगस्ट :
कल्याण पश्चिमेत घडलेल्या घटनेनंतर कल्याण डोंबिवलीतील होर्डींगचा मुद्दा चांगलाच तापला असताना दुसरीकडे कल्याण पूर्वेचा परिसरही याच होर्डींगच्या विषयामुळे चर्चेत आला आहे. या कल्याण पूर्वेच्या विविध भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून “काय हवंय…?” या ठळक मथळ्याखाली होर्डींग लावण्यात येत आहेत.विशेष म्हणजे या होर्डींगमधून थेट कल्याण पूर्वेतील समस्या आणि त्यांच्या मर्मावर बोट ठेवण्यात आल्याने नागरिकांसह राजकीय वर्तुळातही चर्चा सुरू झाली आहे.(What do you want…? Discussion of “that” banner has started in the Kalyan East )

कल्याण पूर्व…कल्याण डोंबिवलीतील राजकीयदृष्ट्या तसा अत्यंत महत्त्वाचा भाग. मात्र कल्याण पश्चिमेशी तुलना करता हा भाग काहीसा दुर्लक्षितच असल्याचीच नागरिकांची भावना. कल्याण पूर्वेतील नागरिकांच्या मनातील नेमक्या याच भावनांना वाट
मोकळी करून देण्याचा प्रयत्न शिवसेना कल्याण पूर्वेचे उपशहरप्रमुख विशाल पावशे यांनी या होर्डिंगच्या माध्यमातून केला आहे. तसं पाहायला गेलं तर खड्डेमुक्त, वाहतूक कोंडीमुक्त असणारे चांगले रस्ते, आरोग्याच्या चांगल्या सुविधा, मुबलक पाणी पुरवठा या आपल्या शहराच्या मूलभूत गरजा. त्यापुढे जाऊन मग मुलांना खेळण्यासाठी क्रीडांगण, ज्येष्ठ नागरिक आणि इतर नागरिकांसाठी उद्याने, विरंगुळा केंद्र यादेखील नागरिकांच्या तशा माफक अपेक्षा असल्यास त्यात वावगे असे काही नाही. मात्र कल्याण पूर्वेचा आणि पश्चिमेचा विचार करता कल्याण पूर्व हे त्यात दुर्दैवाने मागे असल्याचे दिसून येत असल्याचे नागरिकांचे ठाम मत दिसून येत आहे.

या पार्श्वभूमीवर शिवसेना कल्याण पूर्वेचे उपशहरप्रमुख विशाल पावशे यांनी गेल्या काही दिवसांपासून होर्डिंगच्या माध्यमातून इथल्या मूलभूत समस्या मांडत “काय हवंय?” असा अप्रत्यक्ष प्रश्न इथल्या नागरिकांसमोर उपस्थित केला आहे. तसेच पहिल्या होर्डींगमध्ये “काय हवंय? नविन पर्व की जुनेच कल्याण पूर्व ” हा तर दुसऱ्या होर्डींगमध्ये काय हवंय? विकासाच्या ध्यासाचे नविन पर्व, खड्डे आणि ट्रॅफिक कोंडीमुक्त कल्याण पूर्व असे मुद्दे उपस्थित केले आहेत. पावशे यांच्या या मुद्द्यांसोबतच त्यांच्या होर्डींगचीही कल्याण पूर्वेतील नागरिकांमध्ये चांगलीच चर्चा सुरू झाली आहे. तसेच यानंतर आता पुढील होर्डींगमध्ये नेमका कुठला मुद्दा असणार याबाबत उत्सुकताही निर्माण झाली आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा