कल्याण दि.२९ जून :
नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि.बा. पाटील यांचे नाव देण्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संमती दिल्यानंतर भूमिपुत्रांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. तर याबाबत मनसे आमदार राजू पाटील यांनीही मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयाचं स्वागत करत त्यामागील भूमिकेवर मात्र प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. तसेच भविष्यात या मागणीला मूर्त स्वरूप येत नाही तोपर्यंत आम्ही कृती समितीच्या माध्यमातून पाठपुरावा सुरूच ठेवणार असल्याचेही आमदार पाटील यांनी स्पष्ट केले.
नवी मुंबईत बनणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संमती दिल्याचे जाहीर झाले. आणि या मागणीसाठी गेल्या वर्षभरापासून विविध मार्गाने पाठपुरावा करणाऱ्या आगरी कोळी समाज बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर कल्याण ग्रामीणचे मनसे आमदार राजू पाटील यांनीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निर्णयाचे स्वागत केले. काहीही असो हा निर्णय समाजासाठी महत्वाचा असून या निर्णयाचं भूमिकेचं मनापासून स्वागत करतो. मात्र एकीकडे निर्णयाचे स्वागत करतानाच ही भूमिका प्रामाणिक वाटत नाही असं सांगत त्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
तसेच ज्यावेळी त्यांनी बोलावलेल्या बैठकीत आम्ही कृती समिती म्हणून गेलो असताना ते अर्ध्यावर बैठक सोडून का गेले? आताची ही भूमिका तेव्हा आमच्यासमोर का नाही ठेवली ? मंत्री एकनाथ शिंदे यांना इतकं घाबरतात की त्यांच्या शब्दांचा मान ठेवतात असं काही आहे का ? असे प्रश्नही आमदार राजू पाटील यांनी यावेळी उपस्थित केले. त्याचबरोबर सरकार कुठे तरी निसटतयं आणि सरकार निसटताना सहानुभूती घेण्यासाठीचा हा प्रयत्न असल्याचेही आमदार पाटील यांनी सांगितले. मात्र काहीही असो हा निर्णय समाजासाठी महत्वाचा असून या निर्णयाचे मनापासून स्वागत करत असल्याचेही आमदार पाटील यांनी स्पष्ट केले.