कल्याण/डोंबिवली दि.10 एप्रिल:
वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या विकेंड लॉकडाऊनच्या पहिल्या दिवशी कल्याण डोंबिवलीत कडकडीत बंद पाळला. बरोबर एक वर्षानंतर कल्याण डोंबिवलीत पुन्हा एकदा निर्मनुष्य रस्ते, पोलिसांचा फौजफाटा बाजारपेठेत शुकशुकाट असे भयाण चित्र पाहायला मिळाले.
कल्याण डोंबिवलीमध्ये कालच्या रुग्णसंख्येने 2 हजारांचाही आकडा ओलांडला असून दिवसागणिक कोरोनाची स्थिती भयानक होत चालली आहे. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने सोमवार ते शुक्रवार कडक निर्बंध आणि शनिवार -रविवारी विकेंड लॉकडाऊनची घोषणा केली होती. कल्याण डोंबिवलीत व्यापाऱ्यांचा कोरोना निर्बंधांना होत असलेला विरोध आणि काही ठिकाणी बेजबाबदार नागरिकांकडून होणारे नियमांचे उल्लंघन पाहता लॉकडाऊनला शनिवारी कसा प्रतिसाद मिळतो याबाबत प्रश्नचिन्ह होते. मात्र नागरिकांनी लॉकडाऊनच्या आजच्या पहिल्या दिवशी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिल्याचे कल्याण डोंबिवलीत दिसून आले.
शुक्रवारी रात्री 8 नंतरच या विकेंड लॉकडाऊनच्या निर्बंधांना सुरुवात झाली. कल्याण डोंबिवलीतील सर्वच प्रमूख चौक आणि रस्ते आज ओस पडलेले होते. केवळ अत्यावश्यक सेवेसाठी फिरणारी तुरळक वाहने रस्त्यावर दिसत होती.
तर पोलीस प्रशासनाकडून आज कल्याण डोंबिवलीतील प्रमूख रस्ते आणि चौकांचा ताबा घेत रस्त्यावर आढळणाऱ्या नागरिकांची कसून तपासणी सुरू होती. अत्यावश्यक सेवेत असलेल्यांना तपासून पुढे सोडले जात होते आणि विनाकारण घराबाहेर पडलेल्यांना पुन्हा माघारी पाठवले जात होते.
एकंदरीत विकेंड लॉकडाऊनच्या पहिल्या दिवशी कल्याण डोंबिवलीत लोकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिलेला पाहायला मिळाले. आता उद्याच्या दुसऱ्या दिवशी देखील कल्याण डोंबिवलीमध्ये असेच चित्र पाहायला मिळेल असा विश्वास पोलीस आणि पालिका प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे.