रिंगण सोहळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा उत्स्फूर्त सहभाग
कल्याण दि.2 जानेवारी :
धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी काही वर्षांपूर्वी सुरू केलेली मलंग गडमुक्तीच्या आंदोलनानंतर आपण सर्व जण जय मलंग श्री मलंग असे बोलू लागलो, त्याचा आनंद आहे. मलंगगडाच्या बाबतीत आपल्या सर्वांच्या असणाऱ्या भावना आपल्याला माहिती आहेत. काही गोष्टी आपण जाहीरपणे सांगू शकत नाही. मात्र आपल्या सर्वांच्या मनात असणारी मलंगगड मुक्तीची भावना पूर्ण केल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंगळवारी दिली. (We will not rest until the people’s spirit of Malanggarh liberation is fulfilled – Chief Minister Eknath Shinde)
ठाणे – रायगड जिल्ह्यातील वारकरी आणि भागवत संप्रदायांतर्फे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने श्री मलंगगडाच्या पायथ्याशी आयोजित राज्यस्तरीय श्री मलंगगड अखंड हरिनाम सप्ताहाची सुरूवात झाली. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. कोकण प्रांतातील सर्वात मोठ्या अशा या हरिनाम किर्तन महोत्सवाचा प्रारंभ झाला. या सोहळ्यानिमित्त साधू, कीर्तनकार आणि हजारो वारकऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग या सप्ताहाच्या उद्घाटनाप्रसंगी दिसला.
राज्यभरातील हजारो वारकऱ्यांची सोहळ्याला उपस्थिती…
ठाणे – रायगड जिल्ह्यातील वारकरी आणि भागवत संप्रदायांतर्फे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने श्री मलंगगडाच्या पायथ्याशी आयोजित या राज्यस्तरीय श्री मलंगगड अखंड हरिनाम सप्ताहाची सुरूवात मोठ्या उत्साहात झाली. सकाळपासूनच राज्यभरातील वारकऱ्यांची पाऊले मलंगगडाच्या पायथ्याशी असलेल्या अंबरनाथ तालुक्यातील उसाटणेजवळ वळत होती. सकाळपासूनच तरूण, महिला, ज्येष्ठ नागरिकांसह लहानग्या वारकऱ्यांनीही पारंपरिक वेशभुषेत कार्यक्रमस्थळी जमत होते. टाळ मृदुंगाच्या गजरात वारकऱ्यांच्या दिंडीला सुरूवात झाली. या दिंडीमध्ये विठ्ठल रखुमाई, श्री नवनाथ, संत तुकाराम महाराज, छत्रपती शिवाजी महाराज आदींच्या वेशभूषा करून आलेले वैष्णव बांधव उपस्थित होते. तर स्थानिक ग्रामस्थही पारंपरिक वेश परिधान करून टाळ मृदंग, ढोल ताशा, लेझीम पथकासह सहभागी झाले होते. याच दिंडीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहभाग घेतला. टाळ आणि हरिनामाचा गजर करत त्यांनीही दिंडीमध्ये सहभागी होत वारकऱ्यांचा उत्साह वाढवला. यावेळी हरिनाम सप्ताहाचे स्वागतोत्सुक आणि कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनीही दिंडीत सहभाग घेतला.
राजकारणाची झालर बाजूला ठेवून रिंगण सोहळ्यात सहभाग…
या हरिनाम सप्ताहातील उद्घाटन समारंभात मुख्य आकर्षण ठरला तो भव्य असा रिंगण सोहळा. अक्षरशः पंढरपूरप्रमाणे साजऱ्या झालेल्या या रिंगण सोहळ्यात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हाती टाळ घेत भान हरपून सहभागी झाल्याचे दिसून आले. यावेळी हेलिकॉप्टरमधून रिंगण सोहळ्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना या रिंगण सोहळ्यात भागवत धर्माची पताका घेऊन रिंगण सोहळ्यातील ज्ञानेश्वर माऊलींच्या अश्वापुढे धावण्याचा मान मिळाला. हे दोघेही नेते आपापली राजकारणाची झालर बाजूला ठेवून एखाद्या सामान्य वारकऱ्याप्रमाणे या रिंगण सोहळ्यात सहभागी झाले होते.
राजकीय नव्हे तर अध्यात्मिक अधिष्ठान हे सर्वोच्च…
यावेळी बोलताना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वारकऱ्यांशी संवाद साधला. अशा प्रकारचे हरिनाम सप्ताह ही काळाची गरज बनली आहे. अशा सप्ताहांची परंपरा ही आपल्या संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. या सोहळ्याचा समृद्ध वारसा पाहता राजकीय अधिष्ठानापेक्षा अध्यात्मिक अधिष्ठान हे सर्वोच्च असल्याची भावना आपल्या मनात असून जगण्यासाठी माणसाच्या मनात श्रद्धेचा दुवा असला पाहिजे असे मतही यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी व्यक्त केले. मलंगगडाच्या बाबतीत आपल्या सर्वांच्या असणाऱ्या भावना आपल्याला माहिती आहेत. काही गोष्टी आपण जाहीरपणे सांगू शकत नाही. मात्र आपल्या सर्वांच्या मनात असणारी मलंगगड मुक्तीची भावना पूर्ण केल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंगळवारी दिली. या राज्यस्तरीय हरिनाम सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांसोबत आचार्य प्रल्हाद महाराज शास्त्री, विश्वनाथ वारींगे महाराज, चेतन महाराज, दिगंबर शिवनारायण जी, विष्णूदादा मंगरुळकर, संतोष चांगो देशेकर, गोपाळ जी, शंकर गायकर, दिनेश देशमुख यांच्यासह अनेक साधू महंत मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संस्कृती पुढे घेऊन जाण्याचे काम नविन पिढी सक्षमपणे करतेय – खासदार डॉ. श्रीकांत शिंदे…
या महोत्सवात ज्येष्ठ व्यक्तींच्या सोबत इथला तरुण वर्गही मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी झाला होता. यातून एक आत्मविश्वास मिळतोय की धर्माचा झेंडा आणि आपली संस्कृती पुढे घेऊन जाण्याचे काम आपली ही नविन पिढी सक्षमपणे करत असल्याची भावना खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केली.