
कल्याण डोंबिवली दि.10 एप्रिल :
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या अधिकारी – कर्मचाऱ्यांमधील लाचखोरी, हा आता काही नविन प्रकार राहिलेला नाही. मात्र नविन महापालिका आयुक्तांच्या पहिल्याच दिवशी केडीएमसीचा कर्मचारी लाच घेताना पकडला जावा, याला दुर्दैव म्हणावे की योगायोग असा प्रश्न उपस्थित करणारा प्रकार काल घडला आहे. (We will not improve”; New KDMC Commissioner’s first day and Clark’s bribery exposed)
डॉ. इंदू राणी जाखड यांची बदली झाल्यानंतर कल्याण डोंबिवलीचे नविन आयुक्त म्हणून आयएएस अधिकारी अभिनव गोयल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. एकीकडे बुधवारी सकाळी अभिनव गोयल हे आयुक्तपदाचा कार्यभार स्विकारत होते. नागरिक केंद्रीत कारभाराला प्राधान्य देण्याचे सुतोवाच करत होते. तर दुसरीकडे केडीएमसीचा हा लिपिक लाच घेऊन नविन आयुक्तांच्या भूमिकेला हरताळ फासताना दिसत होता.
संतोष पाटणे असे या लिपिकाचे नाव असून तो केडीएमसीच्या आय प्रभाग क्षेत्रातील नागरी सुविधा केंद्रात कार्यरत आहे. तक्रदराच्या भावाचे विवाह प्रमाणपत्र (marriage certificate) देण्यासाठी त्याने ही लाच मागितली होती.
या नागरी सुविधा केंद्रात विवाह प्रमाणपत्र (मॅरेज सर्टिफिकेट) मिळण्यासाठी संबंधित व्यक्तीकडून अर्ज करण्यात आला होता. मात्र या अर्जातील साक्षीदार हे स्थानिक तसेच वधू -वराच्या नात्यातील नसल्याने साक्षीदार न बदलता लवकरात लवकर हे मॅरेज सर्टिफिकेट देण्यासाठी पाटणे याने 2 हजार रुपयांची मागणी केली होती. याची तक्रार ठाणे अँटी करप्शनकडे करण्यात आल्यानंतर झालेल्या पडताळणीमध्ये मॅरेज सर्टिफिकेट देण्यासाठी संतोष पाटणे दीड हजार रुपये मागत असल्याचे निष्पन्न झाले. त्या अनुषंगाने ठाणे अँटी करप्शनने बुधवारी सकाळी सापळा रचून दीड हजार रुपयांची लाच घेताना पाटणे याला रंगेहात पकडण्यात आले.
या लाचखोरीच्या घटनेमुळे कल्याण डोंबिवली महापालिकेतील कर्मचाऱ्यांची खाबूगिरी पुन्हा एकदा दिसून आली आहे. विशेष म्हणजे नविन आयुक्त कार्यभार स्विकारत असताना त्याचवेळी घडलेल्या या प्रकाराने केडीएमसी प्रशासनाच्या अब्रूची लक्तरे वेशीवर टांगली गेलीं आहेत.