डोंबिवलीतील लस्वागत यात्रेमध्ये उत्स्फूर्त सहभाग
डोंबिवली दि.22 मार्च :
डोंबिवलीकर नागरिक हे प्रचंड प्रेमळ आहेत. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या सुरुवातीच्या निवडणूकीत त्यांनी जे प्रेम दिलं ते आपण कदापि विसरू शकणार नाही अशी भावना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीत व्यक्त केली. डोंबिवलीचे आराध्य दैवत असणाऱ्या श्री गणेश मंदिर संस्थानच्या वतीने आयोजित स्वागतयात्रेमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्स्फूर्त सहभागी झाले होते. त्यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना त्यांनी ही भावना व्यक्त केली.
आपली संस्कृती जपण्यासाठी सण – उत्सव आवश्यक…
आपले सरकार आल्यानंतर आम्ही सर्व निर्बंध, मर्यादा काढून टाकल्याने दहीहंडीपासून ते दिवाळीपर्यंत सर्व सण मोठ्या उत्साहात साजरे झाले. राज्याच्या सर्वांगीण विकासासोबत सांस्कृतिक भूकही तितकीच महत्त्वाची आहे. आपली संस्कृती, परंपरा जोपासण्यासाठी, पुढे नेण्यासाठी सण उत्सव आवश्यक असल्याचे मतही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी व्यक्त केले.
धाडसी आणि जलद निर्णय घेणारे देशातील पहिले सरकार…
गेल्या सात आठ महिन्यात राज्य सरकारने अनेक महत्वाचे निर्णय घेतले. त्याचे अवलोकन केल्यास आपल्या लक्षात येईल की एवढे धाडसी आणि जलद निर्णय घेणारे हे देशातील पहिलेच राज्य ठरेल असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.
देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सर्व समावेशक अर्थसंकल्प सादर…
नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पात शेतकरीपासून विद्यार्थ्यांपर्यंत अशा सर्वच स्तरातील लोकांचा विचार करण्यात आला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेला हा अर्थसंकल्प सर्वांना न्याय देणारा असून लेक लाडकी ही सर्वात लोकप्रिय योजना सुरू केल्याचा पुनरुच्चार केला. तसेच एसटीमध्ये महिलांना 50 टक्के सवलत, 75 वर्षांपेक्षा अधिक ज्येष्ठ व्यक्तींना मोफत प्रवास यासारखे अनेक निर्णय घेत हे सर्वसामान्यांचे सरकार असल्याचे आम्ही दाखवून दिल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. तर मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील कलाकारांचा उल्लेख करत त्यांच्याही पाठीशी हे सरकार खंबीरपणे उभे असल्याचे ते म्हणाले.
डोंबिवलीकर प्रचंड प्रेमळ, त्यांचे प्रेम कदापि विसरणार नाही…
खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना सुरुवातीच्या निवडणूकीत जे प्रेम दिलंत ते आपण कदापि विसरू शकणार नाही. डोंबिवलीकर हे प्रचंड प्रेमळ लोकं आहेत. म्हणूनच आमदार खासदार निवडणुकांमध्ये आपण खंबीरपणे पाठीशी उभे राहत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
आमचा पर्सनल अजेंडा नाही, राज्याचा सर्वांगीण विकास महत्वाचा…
स्वागतयात्रेच्या माध्यमातून सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद आणि उत्साह ओसंडून वाहतोय हे आवश्यक आहे. म्हणूनच हे सरकार तुमच्या हिताचे निर्णय घेणार असून आमचा कोणताही पर्सनल अजेंडा नाहीये. राज्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आणि राज्याला प्रगतीकडे नेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची साथ मिळत आहे. हे डबल इंजिन सरकार वेगाने काम करत असून सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये आमुलाग्र बदल हाच आमचा प्रयत्न असणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
गणेश मंदिर संस्थानच्या पाठीशी आपण खंबीर उभे…
गणेश मंदिराचे हे शताब्दी वर्ष असून आपण कोणतीही काळजी करू नका. हा मुख्यमंत्री तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. गणपती बाप्पांच्या आशिर्वादामुळे हे सरकार आले असून तुम्हाला काहीही कमी पडू देणार नाही अशी ग्वाहीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिली.
यावेळी व्यासपीठावर सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे , आमदार राजू पाटील, महापालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे, गणेश मंदिर संस्थानच्या अध्यक्ष अलका मुतालिक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.