माजी आमदार नरेंद्र पवार- कल्याण विकास फाउंडेशनच्या माध्यमातून हृद्य ऋणानुबंध कृतज्ञता सोहळा संपन्न
कल्याण दि.26 जानेवारी :
कल्याण नगरीला नावलौकिक मिळवून देणाऱ्या महनीय व्यक्तींचे एकत्रित स्मारक उभारण्यासाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिका पुढाकार घेईल असे सूतोवाच आयुक्त डॉ. इंदु राणी जाखड यांनी केले आहे. माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या संकल्पनेतून आणि कल्याण विकास फाउंडेशनच्या माध्यमातून संपन्न झालेल्या “ऋणानुबंध कृतज्ञता सोहळ्या”त प्रमूख पाहुणे म्हणून त्या बोलत होत्या. (we will build a collective memorial of Kalyan gems that identify the city – Kdmc Commissioner DR. Indu Rani Jakhad)
कल्याणला वेगळी ओळख प्राप्त करून देत आपल्या कार्यकर्तृत्वाचा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर ठसा उमटवलेल्या 12 महनीय व्यक्तींच्या कुटुंबियांचा सन्मान यावेळी करण्यात आला. तसेच या 12 विभूतींवर आधारित दिनदर्शिकेचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशनही करण्यात आले.
कुटुंबियांच्या सन्मानाने येणाऱ्या पिढीला प्रेरणा मिळणार…
कल्याण शहराच्या जडण घडणीत ज्यांनी सिंहाचा वाटा उचलला अशा कर्तृत्ववान व्यक्तींची सदैव आठवण राहिली पाहिजे. तसेच इथल्या नव्या पिढीला त्यांच्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाची ओळख होण्याच्या उद्देशाने या सर्वांचे एकत्रित स्मारक उभे राहणे गरजेचे असल्याचे आयुक्त डॉ. इंदू राणी जाखड यांनी सांगितले. तसेच माजी आमदार नरेंद्र पवार आणि कल्याण विकास फाउंडेशनने राबवलेल्या या अनोख्या उपक्रमाचे कौतुक करतानाच याठिकाणी झालेल्या मान्यवर व्यक्तींच्या कुटुंबियांच्या सन्मानाने येणाऱ्या पिढीलाही नक्कीच एक प्रेरणा मिळेल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
या 12 विभूतींचे उत्तुंग कार्य दिनदर्शिकेच्या माध्यमातून समोर…
कल्याण शहराचे नाव उंचावणाऱ्या पहिल्या भारतीय महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी, आद्य क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके, सामाजिक कार्यकर्ते शंकरराव झुंजारराव, प्रा. राम कापसे, भगवानराव जोशी, दत्तात्रय धोंडीबा कदम, शिल्पकार भाऊ साठे, कृष्णराव धुळप, माधवराव काणे, मूर्तिकार विठ्ठल ईश्वाद, भारताचार्य चिंतामण विनायक वैद्य, सुप्रसिद्ध उद्योजक डी.पी. लोहार अर्थातच दत्तात्रय पांडुरंग पिंपळे अशा विविध क्षेत्रातील 12 विभूतींच्या कार्याची ओळख करून देणाऱ्या माहितीपूर्ण दिनदर्शिकेचे यावेळी प्रकाशन करण्यात आले. त्यासोबतच या 12 महनीय व्यक्तींच्या कुटुंबातील सदस्यांचा, उपस्थित मान्यवरांच्या हस्ते यथोचित सन्मानही करण्यात आला.
या सर्व महनीय व्यक्ती त्यागातूनच घडल्या…
यावेळी माजी राज्यपाल दिवंगत राम कापसे यांचे पुत्र डॉ. आनंद कापसे यांनी सर्व सत्कारमूर्तींच्यावतीने प्रातिनिधिक स्वरूपात आपले मनोगत व्यक्त करताना नरेंद्र पवार आणि कल्याण विकास फाउंडेशनचे आभार मानले. तसेच कल्याणला नावलौकिक मिळवून देणाऱ्या या सर्व महनीय व्यक्ती त्यागातूनच घडल्याचे सांगत डॉ. आनंद कापसे यांनी आपल्या वडीलांच्या राजकीय कारकिर्दीतील आठवणींना उजाळा दिला.
एकत्रित असो की वेगवेगळे, त्यांचे स्मारक बनले पाहिजे…
कल्याणच्या पुढच्या पिढीला या महनीय व्यक्तींची माहिती जाणे आवश्यक आहे. मग ते एकत्रित असो की वेगवेगळे, त्यांचे स्मारक हे बनले पाहिजे अशा शब्दांत कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी यावेळी आपले विचार मांडले. त्यांच्यासोबत माजी आमदार आणि ज्येष्ठ भाजप नेते जगन्नाथ पाटील यांनीही या कृतज्ञता सोहळ्याच्या आयोजनाबद्दल नरेंद्र पवार आणि कल्याण विकास फाउंडेशनचे आभार मानले.
कल्याण शहर हे रत्नांची खाण…
तर कल्याण शहर हे रत्नांची खाण आहे. कल्याणच्या विकासात आणि जडण घडणीत या सर्व रत्नांचा सिंहाचा वाटा आहे. वेगवेगळ्या क्षेत्रातील उत्तुंग कार्याच्या बळावर या व्यक्तींनी जगाच्या पाठीवर स्वतःची आणि या शहराची ओळख निर्माण केली आहे. या सर्व महान व्यक्ती आणि त्यांचे हे कार्य प्रत्येक कल्याणकर नागरिकाला माहिती होण्याच्या उद्देशाने या 12 वेगवेगळ्या क्षेत्रातील प्रातिनिधिक महनीय व्यक्तींच्या कार्याचा गौरव करण्याचे हे शिवधनुष्य आम्ही उचलले. आणि आपण सर्वांनी त्याला लावलेल्या हातभारामुळे ते यशस्वीपणे पेलले गेल्याची भावना आयोजक माजी आमदार नरेंद्र पवार आणि कल्याण विकास फाउंडेशनच्या अध्यक्ष हेमा पवार यांनी यावेळी व्यक्त केली.
या कृतज्ञता सोहळ्यासाठी सुप्रसिद्ध रांगोळी कलाकार राज खैरनार यांनी या 12 रत्नांची काढलेल्या सुरेख रांगोळीचे सर्वांनीच कौतुक केले. तर चित्रकार राजेश पवार यांनी अतिशय कल्पकतेने साकारलेल्या 12 जणांच्या चित्रांनाही उपस्थितांनी मोठी दाद दिल्याचे दिसून आले. या संपूर्ण कार्यक्रमाची संकल्पना ही माजी आमदार नरेंद्र पवार, कल्याण विकास फाउंडेशन यांची होती. ज्याला संजय जोशी आणि पत्रकार शेखर जोशी यांचे सर्वोत्तम सहकार्य लाभले. तर या कृतज्ञता सोहळ्याचे यशोदा पाटील यांनी अतिशय सुंदर असे सूत्र संचालन केले.
यावेळी आयुक्त डॉ. इंदू राणी जाखड, आमदार विश्वनाथ भोईर, माजी मंत्री जगन्नाथ पाटील, भाजप जिल्हाध्यक्ष नरेंद्र सुर्यवंशी, भाजप मंडल अध्यक्ष वरुण पाटील, शक्तीवान भोईर यांच्यासह माजी आमदार नरेंद्र पवार आणि कल्याण विकास फाउंडेशनच्या अध्यक्ष हेमा पवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.