कल्याणच्या सर्व शिवसेना शाखांमध्ये रक्षाबंधनाचा अनोखा सामूहिक सोहळा
कल्याण दि.19 ऑगस्ट :
राज्याच्या मुख्यमंत्रीपदी पुन्हा एकनाथ शिंदेच येवोत, आम्हाला पुन्हा हेच मुख्यमंत्री हवेत अशा शब्दांत कल्याणातील लाडक्या बहिणींनी आजच्या रक्षाबंधनाचे औचित्य साधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शुभेच्छा दिल्या. निमित्त होते ते मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांच्या सामूहिक रक्षाबंधन सोहळ्याचे. शिवसेनेच्या कल्याण पश्चिमेतील सर्वच्या सर्व शाखांमध्ये एकाच वेळी हा सोहळा संपन्न झाला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलेल्या लाडकी बहीण योजनेला महाराष्ट्रात प्रचंड असा प्रतिसाद मिळत आहे. या बहिणींप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासह आजचा रक्षाबंधनाचा सण साजरा करण्याच्या उद्देशाने शिवसेना पक्षातर्फे या सामूहिक रक्षाबंधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या योजनेच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील लाखो माता भगिनींच्या खात्यामध्ये प्रत्येकी 3 हजार रुपये जमा केले आहेत. याचा आनंद साजरा करण्यासाठी शिवसेना पक्षातर्फे कल्याण शहर शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक शाखेमध्ये रक्षाबंधनाचा कार्यक्रम केल्याची माहिती शिवसेना कल्याण शहरप्रमुख रवी पाटील यांनी प्रसिध्दी माध्यमांना दिली.
तसेच या सोहळ्याच्या माध्यमातून अनेक महिला या त्यांच्या शिवसेनेच्या भावांकडे आल्या. कारण त्यांना माहिती आहे की आम्हीच त्यांचे खरे रक्षणकर्ते आहोत. त्यामुळे त्यांनी आम्हाला केवळ रक्षाबंधनाचा नाही तर एक विश्वासाचा धागा बांधत मुख्यमंत्री म्हणून पुन्हा एकनाथ शिंदे हेच हवेत अशा शुभेच्छाही दिल्याचे रवी पाटील यांनी यावेळी सांगितले.
तर यावेळी शिवसेनेच्या बिर्ला कॉलेज विभागीय शाखेमध्ये लाडकी बहीण योजनेसाठी पात्र झालेल्या अनेक महिलांची रक्षाबंधन सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थिती होती. ज्यांनी सर्वांनी पुन्हा एकदा एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री व्हावेत अशी तीव्र भावना जाहीरपणे व्यक्त केली. तर बिर्ला कॉलेज विभागीय शाखा, वायले नगर, चिकणघर गावठाण शाखा, मोहने मध्यवर्ती शाखेसह इतर सर्व शाखांमध्ये हा सोहळा संपन्न झाला.
यावेळी उपविभाग प्रमुख दिपक धनावडे, महिला उपशाखा संघटक वंदना जळवी, गीता मोहिले, गटप्रमुख सुनील वाघ, कल्याण जिल्हा सचिव योगेश पाटील, शहर समन्वयक राम मुसळे, उपशहरप्रमुख अनिरुद्ध पाटील, उपशाखा प्रमुख ओमकार हारावडे, युवासैनिक सोहम बेनकर, संकेत वाघ, साहिल चौथे, भावेश चौधरी, दुर्गेश पाटील आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित होते.