कल्याणातील सेंट लॉरेन्स शाळेच्या ऑडीटोरियमचे पवार यांच्या उपस्थितीत उद्घाटन
कल्याण दि.26 नोव्हेंबर :
कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात ज्ञानदानाचे काम सुरू केले. त्यांचा हा ज्ञानदानाचा वसा आम्ही एकत्रितपणे चालवत असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांनी आज कल्याणात केले. कल्याणातील सेंट लॉरेन्स शाळेच्या ऑडिटोरियमचे उद्घाटन शरद पवार यांच्या उपस्थितीत करण्यात आले. त्यावेळी शरद पवार बोलत होते. (We are running Karmaveer Bhaurao Patil’s heritage of knowledge together – Sharad Pawar)
शिक्षणाचे सार्वत्रिकरण हा महत्त्वाचा विषय असून समाजातील शेवटच्या घटकाला त्याचा लाभ मिळाला पाहिजे. हे सार्वत्रिकरण होण्यासाठी अनेकांनी बरेच वर्षे कष्ट घेतले. काही शैक्षणिक संस्था तर अशा आहेत, ज्या 150,100 ते 75 वर्षांपासून ज्ञानदानाचे व्रत आचरणाप्रमाणे काम करत आहेत. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी महाराष्ट्रातील शैक्षणिक क्षेत्रामध्ये प्रचंड योगदान दिले आहे. 100 वर्षांपूर्वी त्यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना करून महाराष्ट्रातील ग्रामीण भागात ज्ञानदानाचे कार्य सुरू केले. त्या संस्थेच्या अध्यक्षपदी आपण असून कर्मवीरांचे विद्यादानाचे हेच काम आम्ही सर्व मिळून एकत्रपणे करत असल्याचे शरद पवार यावेळी म्हणाले. या रयत शिक्षण संस्थेमध्ये आज 4 लाख विद्यार्थी शिक्षण घेत असून 70पेक्षा जास्त कॉलेजेस आहेत. ठाणे जिल्ह्याच्या टोकाला तलासरीमध्येही या संस्थेची शाळा ज्ञानदानाचे काम करत आहे. ग्रामीण भागातील लोकांना मुख्य प्रवाहात आणणे ही तुमची आणि आपली जबाबदारी असल्याचे मतही पवार यांनी यावेळी व्यक्त केले. तर अशाच मिशनरी वृत्तीने काम करणारा एक वर्ग या देशामध्ये आहे. सेवाभावी वृत्तीच्या माध्यमातून शिक्षण देण्याचे काम केले जात असून त्यापैकी सेंट लॉरेन्स ही संस्था आहे. ज्ञानदानाचे मिशन या भावनेतून देशाच्या अनेक भागामध्ये ही लोकं काम करत असल्याचे गौरवोद्गार त्यांनी यावेळी काढले.
कृष्णराव धूळपांमुळे कल्याणचा आणि आपला जुना ऋणानुबंध…
आपण महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये 56 वर्षांपूर्वी आपण प्रथम प्रवेश केला तेव्हा आपले वय साधारणपणे 26-27 होते. त्यावेळी नवीन सभासद होतो आणि माझ्यासारख्या काही नव्या लोकांना मार्गदर्शन करण्यासाठी एक अतिशय हुशार व्यक्ती होती. आणि ती कल्याणचे कृष्णराव धुळप असे सांगत शरद पवार यांनी आपल्या उमेदीच्या काळातील आठवणींना उजाळा दिला. विधानसभेमध्ये कृष्णराव धुळप यांचे प्रचंड योगदान होते. आम्हाला कधी काही महत्त्वाच्या प्रश्नांची माहिती करून घ्यायची असल्यास आम्ही त्यांच्याकडे जायचो आणि ते अतिशय चांगल्या प्रकारे आम्हाला मार्गदर्शन करायचे. आपल्या राजकारणाच्या, सार्वजनिक कामाच्या सुरुवातीच्या काळामध्ये कृष्णराव धुळप यांच्या रूपाने कल्याणशी एक ऋणानुबंध जुळल्याचेही सांगत त्यांनी धुळप यांच्याविषयी कृज्ञतेची भावना व्यक्त केली.
यावेळी माजी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे, सेंट लॉरेन्स शाळेचे चेअरमन सिल्व्हीस्टर डिसोझा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान शाळेतील उद्घाटन समारंभाला येण्यापूर्वी शरद पवार यांनी प्रवक्ते महेश तपासे यांच्या घरी सदिच्छा भेट दिली. त्याठिकाणी विविध सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधी आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले.