
(प्रातिनिधिक फोटो)
देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी पाणी आणि वीज पुरवठा बंद
कल्याण दि.19 एप्रिल :
कल्याण पश्चिमेतील नागरिकांसाठी उद्याचा (मंगळवार 22 एप्रिल 2025) दिवस म्हणजे अग्निपरीक्षेचा ठरणार आहे. कारण या परिसरातील काही भागांमध्ये उद्या पाणी पुरवठा आणि वीज पुरवठा अशा दोन्ही गोष्टी देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी काही तासांपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत. केडीएमसी पाणी पुरवठा विभाग आणि महावितरणतर्फे याबाबत माहिती देण्यात आली आहे. (Water supply will be cut off for 9 hours and electricity supply will be cut off for 5 hours in “these areas”)
उच्चदाब वीज वाहिनीच्या दुरुस्तीसाठी आधारवाडी फिडरवरील वीज पुरवठा 5 तास बंद…
महावितरणतर्फे उद्या मंगळवार 22 एप्रिल 2025 रोजी २२ के. व्ही. उच्चदाब वाहिनीच्या दुरुस्ती आणि देखभालीचे महत्वाचे काम केले जाणार आहे. त्यामुळे आधारवाडी फिडरवर सकाळी १० वाजल्यापासून दुपारी ३ वाजेपर्यंत असा 5 तासांचा शटडाउन घेण्यात येणार आहे. परिणामी या फिडरवरून वीज पुरवठा होणाऱ्या आधारवाडी चौक, वाडेघर, माधव बँकवेट, ग्रीन लीफ, विहंग व्ह्यू, शांती धाम, अन्नपूर्णा नगर, लीला हॉटेल, सर्वोदय onx, आधारवाडी जेल, निक्की नगर, भागीरथी नगर, साकेत, त्रिवेणी गार्डन आणि आजूबाजूच्या परिसरातील वीज पुरवठा पूर्णपणे बंद राहणार असल्याची माहिती महावितरणतर्फे देण्यात आली आहे. तसेच हे देखभाल दुरुस्ती काम पूर्ण होण्याच्या वेळेनुसार यामध्ये बदल होण्याची शक्यता व्यक्त करत नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहनही महावितरणतर्फे करण्यात आले आहे.
कल्याण – टिटवाळ्याच्या या भागात उद्या 9 तास पाणी नाही…
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या मोहिली जलशुद्धीकरण केंद्र येथील अशुद्ध आणि शुद्ध पाण्याच्या मुख्य जलवाहिनीवर फ्लो मीटर बसविण्यात येणार आहे. या कामासाठी उद्या मंगळवारी २२ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत असा ९ तास पुढील भागांचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
या भागांचा पाणी पुरवठा राहणार बंद…
केडीएमसीच्या मोहिली जलशुध्दीकरण केंद्रामधून महानगरपालिका क्षेत्रातील कल्याण ग्रामीण विभाग म्हणजेच मांडा-टिटवाळा, वडवली, आंबिवली, शहाड, अटाळी तसेच इतर गावे, कल्याण पश्चिमेतील “ब” प्रभाग क्षेत्रातील मिलिंद नगर, योगिधाम, चिकण घर, बिर्ला कॉलेज परिसर, मुरबाड रोड परिसर या भागांचा पाणी पुरवठा बंद राहणार असल्याचेही केडीएमसी पाणी पुरवठा 9 तास बंद राहणार आहे.
दरम्यान एकीकडे उष्णतेच्या लाटेचा इशारा, वाढत्या तापमानामुळे होणारा त्रास असतानाच आता त्यामध्ये वीज आणि पाणी पुरवठाही देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी बंद राहणार असल्याने उद्या नागरिकांना एकप्रकारे अग्निपरीक्षेला सामोरे जावे लागणार आहे.