कल्याण दि.21 मे :
नवी मुंबई महापालिकेला लागून असणाऱ्या १४ गावांमधील नागरिकांना गेल्या कित्येक वर्षांपासून पाणीटंचाईला सामोरे जावे लागत होते. यासाठी मनसे आमदार राजू पाटील यांनी स्वतः या कामाची पाहणी करत पाठपुरावा सुरु केला होता. अखेर हे काम लवकरच पूर्णत्वास येत असून १४ गावातील पाणी समस्या आता सुटणार असल्याची माहिती आमदार राजू पाटील यांनी दिली.
कल्याण ग्रामीणचे आमदार प्रमोद (राजू )रतन पाटील यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांशी अनेक वेळा एकत्रित बैठंक याविषयी काय उपाय करता येईल यावर चर्चा करत लोकांना लवकरात लवकर पाणी कसे मिळेल यावर भर दिला होता. आमदार पाटील यांनी आज ठाणे जिल्हा परिषद, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिकाऱी आणि ठेकेदार यांच्यासह १४ गावांच्या पाणी पुरवठा योजनेच्या कामाची पाहणी केली. या पाहणीमध्ये हे काम आता जवळजवळ पूर्णत्वास आल्याचे दिसले. आमदार राजू पाटील यांनी स्वतः नागाव, दहिसर,भंडारली आदी गावांमधील पाणीपुरवठा योजनेची माहिती घेत गावकऱ्यांसोबत चर्चा केली आहे. त्यामुळे देश स्वातंत्र्याच्या कालखंडानंतर या गावांत पहिल्यांदाच नळाचं पाणी येणार असल्याने गावकऱ्यांमध्ये देखील आनंदाचे वातावरण आहे.
नावाळी रुग्णालयाचीही पाहणी
नवी मुंबई महापालिकेत समाविष्ठ असताना १४ गावांसाठी आरोग्य केंद्र सुरु करण्यात आले होते. मात्र नवी मुंबई महापालिकेतून ही गावं वगळल्याने रुग्णालयाची देखभाल दुरुस्ती झाली नाही. त्यामुळे आता ही वास्तू धूळखात पडली असल्याने तिच्या नव्याने निर्मितीसाठी आणि तांत्रिक बाबी दूर करण्यासाठी ग्रामस्थांसह आमदार राजू पाटील यांनी या रुग्णालयाचीही पाहणी केली आहे. यावेळी १४ गाव सर्वपक्षीय विकास समिती अध्यक्ष लक्ष्मण पाटील, प्रदीप मोकाशी, मोतीराम गोंधळी यांच्यासह अन्य पदाधिकारी आणि ग्रामस्थदेखील उपस्थित होते.