कल्याण दि. १९ जुलै :
एकीकडे मुसळधार पाऊस पडत असूनही नागरिक मात्र पाण्याविना राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. केडीएमसीच्या मोहिली उदंचन केंद्राचा परिसर जलमय झाल्याने खरबदरीचा भाग म्हणून इथली मशिनरी तात्पुरत्या स्वरूपात हलवण्यात आली आहे. परिणामी नागरिकांवर पाण्याविना राहण्याची वेळ ओढवली आहे.
म्हणून पाणी पुरवठ्यावर परिणाम…
उल्हास नदीच्या काठी केडीएमसीचे हे मोहीली उदंचन केंद्र आहे. दरवर्षी पावसाळ्यात उल्हास नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने हे केंद्र बंद ठेवण्याची वेळ केडीएमसी प्रशासनावर येते. पुणे ग्रामीण आणि लोणावळा परिसरात सध्या तुफान पाऊस पडत असून ते सर्व पाणी वाहून इकडे उल्हास नदीमध्ये वाहून येत आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर पाणी वाढल्याने साहजिकच उल्हास नदीचे पात्र मग आपली धोक्याची पातळी सोडून वाहू लागल्याने या मोहीली उदंचन केंद्राला त्याचा फटका बसला आहे. परिणामी पंपिंग केंद्रावरील महागडी मशिनरी खराब होऊ नये म्हणून ती काढून तात्पुरत्या स्वरूपात सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आल्याची माहिती पाणी पुरवठा विभागाकडून देण्यात आली.
या भागातील पाणी पुरवठ्यावर होणार परिणाम…
हे पंपिंग तात्पुरत्या स्वरूपात बंद झाल्याने शहाड, वडवली, टिटवाळ्याचा काही भाग, कल्याण पश्चिमेतील अनुपम नगर – घोलप नगर – सिंडिकेट तर कल्याण पूर्वेतील अशोक नगर, वालधुनी परिसरातील पाणी पुरवठ्यावर याचा परिणाम होणार आहे.
पाणी पुरवठा सुरळीत झाल्यावर…
दरम्यान नदीपात्रातील पाणी ओसरल्यानंतर पंपीग चालू करण्यात येईल. मात्र पाणीपुरवठा सुरू झाल्यावर नागरिकांनी न विसरता उकळून आणि गाळून पाणी पिण्याचे आवाहन कार्यकारी अभियंता प्रमोद मोरे यांनी केले आहे.