उल्हासनगर दि .15 सप्टेंबर :
मागील आठवड्यात उल्हासनगर वासीयांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी सर्व मंडळाचे अधिकारी आणि पालिका आयुक्त यांची एकत्र बैठक आयोजित करण्यात आली होती. सर्वसामान्य जनता वारंवार तक्रारी करून सुद्धा पालिका प्रशासन जागे होत नसल्याने आमदारांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले होते.
त्याच अनुषंगाने आमदार गणपत गायकवाड यांनी उल्हासनगरवासीयांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. काही नागरिकांनी त्यांना घरी होणारा पाणी पुरवठा हा अत्यंत गढूळ आणि कमी दाबाने होत असल्याचे सांगितले.
जनतेचा लोकप्रतिनिधी म्हणून सर्व नागरिकांच्या प्रभाग निहाय भेटी घेऊन त्यांचे प्रश्न अधिकाऱ्यांसमोर मांडणार आहे. येत्या 15 दिवसात उल्हासनगरवासीयांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न पालिका प्रशासनाने मार्गी लावला नाही तर मोठे आंदोलन छेडण्याचा इशारा आमदार गणपत गायकवाड यांनी दिला आहे.