डोंबिवली दि.10 मे :
राज्य शासनाकडून कल्याण डोंबिवलीसह एमएमआर क्षेत्रात अत्यंत तुटपुंज्या प्रमाणात कोवीड लस उपलब्ध करून दिल्या जात आहेत. मात्र लोकसंख्येच्या तुलनेत जास्तीत जास्त कोवीड लस उपलब्ध न झाल्यास याविरोधात उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा डोंबिवलीचे आमदार आणि माजी राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांनी दिला आहे. कल्याण डोंबिवलीतील कोवीड लसीकरण आणि प्राप्त लसींच्या मुद्द्यांवरून आमदार चव्हाण यांनी राज्य सरकार, पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टिका केली. (Violent agitation if proper amount of Kovid vaccine is not available for Kalyan Dombivali – MLA Ravindra Chavan)
कल्याण डोंबिवलीसह एमएमआर क्षेत्रात राज्य सरकारकडून तुटपुंज्या प्रमाणात लस उपलब्ध करून दिली जात आहे. केंद्राकडून राज्य सरकारला पुरेशी लस उपलब्ध करून दिली जात आहे. मात्र राज्य सरकार ती आपल्याला उपलब्ध करून देण्यामध्ये दुजाभाव करत असल्याचा आरोपही आमदार रविंद्र चव्हाण यांनी यावेळी केला. तर एकनाथ शिंदे यांच्याकडे ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद असून कल्याण डोंबिवलीसह जिल्ह्यातील इतर महापालिकांना पुरेशी लस उपलब्ध होते की नाही याकडे त्यांनी लक्ष देणे आवश्यक आहे. तसेच या भागासाठी योग्य प्रमाणात लस मिळत नसल्यास शासनाचे प्रतिनिधी म्हणून त्यांनी ती मिळवूनही दिली पाहीजे असे मत चव्हाण यांनी व्यक्त केले.
तर 18 ते 44 वयोगटासाठी केवळ कल्याणातच लसीकरण केंद्र आहे. डोंबिवली किंवा कल्याण ग्रामीण भागात असे केंद्र का नाही ? याचे उत्तर प्रशासनाकडे नाही. त्यामुळे फक्त उद्घाटनापुरता लसीकरण केंद्र सुरू असून ज्या गतीने लसीकरण होणे आवश्यक आहे त्या गतीने ते होत नसल्याचा आरोपही आमदार चव्हाण यांनी यावेळी केला. तर येत्या काळात कल्याण डोंबिवलीसाठी पुरेशा प्रमाणात कोवीड लस उपलब्ध न झाल्यास उग्र आंदोलन छेडून याबाबत जाब विचारला जाईल असा इशाराही रविंद्र चव्हाण यांनी यावेळी दिला.