Home क्राइम वॉच कल्याणातील डिलिव्हरी बॉईजची “अशीही बनवा बनवी”; जागरूक युवकांनी उघड केला प्रकार

कल्याणातील डिलिव्हरी बॉईजची “अशीही बनवा बनवी”; जागरूक युवकांनी उघड केला प्रकार

 

कल्याण दि.13 जानेवारी :
वाहतुकीचे कोणतेही नियम किंवा चौकातील सिग्नल तोडण्याचा नुसता विचार केला तरी, वाहतूक पोलिसांचा दंड आणि कारवाईचा विचार करून कायद्याने वागणाऱ्या सामान्य नागरिकांना घाम फुटतो. अशावेळी कल्याणात वस्तू – पदार्थांच्या डिलिव्हरीचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून मात्र वाहतुकीचे हे सर्व नियम आणि कायदे धाब्यावर बसवण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. कल्याणातील काही जागरूक युवकांनी डिलिव्हरी बॉईजची ही बनवा बनवी उघड केली आहे. या बनवा बनवीला पोलिसांनी वेळीच आळा घातला नाही तर भविष्यात याचे गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात.(Violation of traffic rules by delivery boys in Kalyan city)

कोवीड काळानंतर खाद्य पदार्थांपासून ते इलेक्ट्रॉनिक अशा विविध वस्तू घरपोच किंवा आपल्याला हव्या त्याठिकाणी मागविण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. ज्याला गेल्या दोन वर्षांमध्ये मोठ्या संख्येने प्रतिसाद मिळत असून परिणामी शहरातील डिलिव्हरी कर्मचाऱ्यांची संख्यही लक्षणीय वाढली आहे. परंतू अधिकाधिक ग्राहकांना त्यांची ऑर्डर पोहचवण्याच्या नादामध्ये काही डिलिव्हरी बोईजकडून कायदा आणि वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार निलेश जगदाळे आणि त्याच्या मित्रांनी उघड केला आहे. यासंदर्भात सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करून या डिलिव्हरी बॉईजच्या कृष्णकृत्यांची माहिती देण्यात आली आहे.

कल्याण पश्चिमेतील खडकपाडा परिसरात राहणाऱ्या निलेश यांना गेल्या डिसेंबर महिन्यात डिलिव्हरी कर्मचाऱ्यांबाबत एक वेगळीच गोष्ट आढळून आली. ग्राहकांना घरपोच पुरवठा करणाऱ्या या डिलिव्हरी बोईजच्या काही गाड्यांवर नंबर प्लेटच नव्हती. तर काहींनी असलेल्या नंबर प्लेटवरील शेवटचे दोन आकडे चिकटपट्टीने (स्टिकर) झाकलेले होते. जेणेकरून गाडीचा पूर्ण नंबर दिसत नसल्याने गाडी मालकाची कोणतीही माहिती मिळू शकणार नव्हती. शहरातील प्रमुख चौकात उभारण्यात आलेले ट्रॅफिक सिग्नल तोडण्यासाठी डिलिव्हरी बोईज अशाप्रकारची युक्ती वापरत असल्याचे आढळून आले.

मात्र या डिलिव्हरी बॉईजच्या या कृत्याचा बारकाईने विचार केला असता, केवळ वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवणे ही प्राथमिक कृतीपुरताच हे असू शकेल याची शाश्वती कोण देणार ? अशा एखाद्या नकारात्मक मनोवृत्तीच्या डिलिव्हरी बॉयकडून कोणतेही भयानक कृत्य घडले तर पोलीस प्रशासन त्यांचा माग कसा काढणार असा प्रश्न निलेश जगदाळे यांनी उपस्थित केला आहे. तर काही ठिकाणी या डिलिव्हरी बॉयकडून डिलिव्हरी देताना महिला आणि मुलींची छेडछाड झाल्याच्या घटनाही घडल्या असून त्याकडे डोळेझाक करून चालणार नाही. त्यामुळे जगदाळे यांनी तातडीने वाहतूक पोलीसांच्या निदर्शनास ही बाब आणून दिल्यानंतर संबंधित डिलिव्हरी बॉईजवर कारवाईही झाली असल्याचे जगदाळे यांनी सांगितले.

दरम्यान या सर्व पार्श्वभूमीवर कल्याण शहर वाहतूक पोलिसांनी वाहतुकीचे नियम आणि पर्यायाने कायदा धाब्यावर बसवणाऱ्या या डिलिव्हरी बॉईजवर कारवाई केली असली तरी अशा व्यक्ती आणि प्रवृत्तींना कायमस्वरूपी आळा घालण्यासाठी नियमांची कठोरपणे अंमलबजावणी करण्याची गरज नागरिकांकडून व्यक्त होत आहे. अन्यथा नेहमीप्रमाणे एखादी मोठी घटना घडल्यानंतरच शासकीय यंत्रणा जागी होईल, मात्र तोपर्यंत कारवाईला व्हायचा तो उशिर आणि नागरिकांचे नुकसान झालेले असेल.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा