Home बातम्या ज्योती भारती यांच्या ‘बोलावं म्हणतेय’ काव्यसंग्रहाला विद्रोही साहित्य विचार मंचचा पुरस्कार जाहीर

ज्योती भारती यांच्या ‘बोलावं म्हणतेय’ काव्यसंग्रहाला विद्रोही साहित्य विचार मंचचा पुरस्कार जाहीर

 

कल्याण दि.१३ जून : 

ज्योती हनुमंत भारती यांच्या बोलावं म्हणतेय या काव्य संग्रहाला “नाठाळाच्या माथी हाणू काठी, साहित्य पुरस्कार” जाहीर झाला आहे. बोलावं म्हणतेय, या काव्यसंग्रहाला यापूर्वी सोलापूर वडशिवणे येथील गावगाडा साहित्य पुरस्कार प्राप्त झाला आहे. मा.पार्थ पोळके यांच्या हस्ते गावगाडा पुरस्कार नुकताच पुण्यात प्रदान करण्यात आला. याबरोबरच गेल्या वर्षी फेसबुकवरील “लॉकडाउनच्या कविता” या ज्योती भारती यांच्या विशेष उपक्रमासाठी न्यायिक लढा पत्रकार संघाकडून त्यांना “साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे” हा पुरस्कार देऊन सन्मानित केले गेले. केवळ कविता लिहूनच त्या थांबल्या नाहीत तर “दैनिक संचार” सारख्या वृत्तपत्रातून सुरू असलेल्या त्यांच्या “सोशल चौकट” या सदरातमार्फतही त्या आपल्या निर्भीड लेखणीने अनेक ज्वलंत प्रश्नांना वाचा फोडत आहेत

विद्रोही साहित्य संमेलनात ‘नाथळाच्या माथी हाणू काठी, क्रांती पुरस्कारा’चेही वितरण होणार आहे. त्यामध्ये शमीभा पाटील, मुबारकभाई शेख, विश्वंभर वराट, विजयमाला वाठोरे, सिद्दीकभाई शेख आदी मान्यवरांचा समावेश आहे. तसेच साहित्य पुरस्कारासाठी ज्योती भारती यांच्यासह अभिनेते किरण माने, लेखिका प्रज्ञा बागुल, कवी विकी कांबळे तसेच दैनिक लोकमतचे वरिष्ठ पत्रकार गणेश खंडाळे यांच्या साहित्याची निवड झाली आहे.

येत्या २४ जून रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन, पुणे येथे होणाऱ्या या विद्रोही साहित्य संमेलनात हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. लोकमत पुणेचे संपादक संजय आवटे यांच्या हस्ते या संमेलनाचे उद्घाटन होणार असून, जेष्ठ साहित्यिक व विचारवंत डॉ श्रीपाल सबनीस हे संमेलनाचे अध्यक्ष असणार आहेत. लेखक, कवी, व्यंगचित्रकार डॉ. सुहासभाई मुळे हे संमेलनाचे प्रमुख पाहुणे असणार आहेत. जेष्ठ कवी, प्रकाशक चंद्रकांत वानखेडे तसेच कवी, दिग्दर्शक हृदयमानव अशोक यांची विशेष उपस्थिती असणार आहे अशी माहिती सचिव अमोल घाटविसावे आणि आयोजक राजू वाघमारे यांनी दिली आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा