कल्याण दि.25 जून :
कल्याणातील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक वामनराव साठे यांचे दिर्घ आजाराने आज दुपारी त्यांच्या कल्याण येथील निवासस्थानी निधन झाले. ते ९३ वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात एक मुलगा, दोन मुली आणि मोठा परिवार आहे.(Veteran social worker Vamanrao Sathe passed away in Kalyan)
वामनराव साठे हे कल्याण जनता सहकारी बँकेचे संस्थापक सदस्य होते. तसेच कल्याणच्या सर्व सामाजिक चळवळींचे साक्षीदार होते. भारतीय जनसंघ महाराष्ट्रात पसरविण्यात त्यांनी खूप परिश्रम घेतले. कल्याणच्या ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्यावरील हिंदूंच्या आधिकारावर न्यायालयाचे शिक्कामोर्तब करण्याचे कामात कै. ॲड. भाऊसाहेब मोडक, कै. भाऊराव सबनीस आणि कै. म.ना. सहस्रबुद्धे यांच्यासोबत त्यांचाही मोलाचा वाटा होता.
तर कल्याण जनता सहकारी बँकेच्या उभारणीत आणि प्रगतीत त्यांचे महत्वाचे योगदान आहे. त्याचबरोबर छत्रपती शिक्षण मंडळ, स्त्री शिक्षण मंडळ, सुभेदार वाडा शताब्दी गणेशोत्सव अशा गाव म्हणून असलेल्या सर्व कामांत त्यांचा कायम हिरीरीने सहभाग राहीला आहे.
तर जागतिक कीर्तीचे शिल्पकार आणि त्यांचे बंधू भाऊराव साठे यांना दिल्ली, मुंबई आणि नागपूर येथील जगप्रसिद्ध छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे उभारण्यातही वामनराव यांनी सहाय्य केले.
अशा या कल्याणच्या सामाजिक क्षेत्रातील अग्रणी असलेल्या वामनराव साठे यांच्या निधनाने कल्याणचा संपूर्ण इतिहास जाणणारा, ज्ञानी आणि त्यागी मनुष्य आपण गमावला आहे अशा शब्दांत माजी आमदार नरेंद्र पवार यांनी त्यांना श्रध्दांजली वाहली आहे.