खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत प्रवेश
मुंबई दि.२५ जानेवारी :
कल्याण डोंबिवलीमधील उद्धव ठाकरे गटासह राष्ट्रवादी आणि रिपब्लिकन पक्षाच्या पदाधिकारी -कार्यकर्त्यांनी काल बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केला. मुंबई येथील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थित पदाधिकाऱ्यांसह शेकडो कार्यकर्त्यांनी बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे.
डोंबिवली शहरात ठाकरे गटामध्ये पदांच्या फेरबदलांवरुन पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचे वातावरण असल्याची माहिती युवासेनेचे डोंबिवली विधानसभा अधिकारी राहूल म्हात्रे यांनी या पक्षप्रवेशानंतर प्रसिद्धी माध्यमांना दिली. या पार्श्वभूमीवर आपण आणि युवासेना डोंबिवली शहर समन्वयक जितेन पाटील यांच्यासह नाराज पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची भेट घेत त्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यामार्फत महाराष्ट्रात सुरू असणारी वेगवान विकासकामे समजावून सांगितल्याचेही राहुल म्हात्रे म्हणाले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या कामाने प्रेरीत होऊन डोंबिवली पश्चिमेतील राजू नगर, गरिबाचा वाडा, नवा पाडा, पूर्वेतील अंबिका नगर, गोग्रासवाडी परिसरातील उद्धव ठाकरे गट, राष्ट्रवादी आणि रिपब्लिकन पक्षाच्या अनेक पदाधिकारी महिला कार्यकर्त्यांनी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाला पाठिंबा देत पक्षात प्रवेश केला आहे.
यावेळी कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे, आमदार बालाजी किणीकर, उपजिल्हा प्रमुख राजेश कदम, युवा सेना प्रदेश समन्वयक माजी सभापती दिपेश म्हात्रे आदी पदाधिकारी उपस्थित होते.