Home ठळक बातम्या क्या बात है : सीए’च्या परीक्षेत डोंबिवलीचा वैभव हरिहरन देशामध्ये दुसरा

क्या बात है : सीए’च्या परीक्षेत डोंबिवलीचा वैभव हरिहरन देशामध्ये दुसरा


डोंबिवली दि.22 मार्च :
इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंटस् ऑफ इंडियातर्फे (ica) घेण्यात आलेल्या ‘सीए’ ( chartered accountant) च्या परीक्षेत डोंबिवलीकर वैभव हरिहरनने देशामध्ये दुसरा येण्याचा बहुमान मिळवला आहे. गेल्यावर्षी जानेवारी महिन्यात ही परीक्षा घेण्यात आली होती. रविवारी संध्याकाळी त्याचा निकाल जाहीर करण्यात आला.

डोंबिवलीच्या खंबाळपाडा परिसरात हे हरिहरन कुटुंबिय राहतात. वैभव लहानपणापासूनच हुशार विद्यार्थी म्हणून परिचित आहे. शाळेमध्ये असताना वैभव सीबीएसई बोर्डामध्ये पहिला आला होता. तर बारावीला युनिव्हर्सिटीमध्येही त्याने पहिल्या क्रमांकाला गवसणी घातली होती. सीए परीक्षेत आपल्याला चांगले मार्क्स मिळतील अशी खात्री होती, परंतु आपण देशामध्ये दुसरे येऊ हा विचार आपण केला नव्हता अशी प्रतिक्रिया वैभवने दिली आहे. सुरुवातीला आपण 10 ते 12 तास अभ्यास करत होतो. तर परीक्षा जवळ आल्यानंतर आपण त्यात वाढ करून 14 ते 18 तास अभ्यास केल्याचे वैभव म्हणाला.

वैभवचे बाबा निवृत्त बँक कर्मचारी असून आई खासगी शाळेमध्ये शिक्षिका आहे. वैभवच्या या उत्तुंग यशाने त्याचे आई-बाबाही भारावून गेले असून वैभवसह त्यांच्यावरही अभिनंदन आणि कौतुकाचा वर्षाव होत आहे. तर 2017 मध्येही डोंबिवलीच्याच राज शेठने सीए परीक्षेत देशामध्ये पहिला येण्याचा मान मिळवला होता. त्यानंतर आता पुन्हा वैभव हरिहरने त्याचीच पुनरावृत्ती करत डोंबिवलीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा