कल्याण डोंबिवली दि.3 जुलै :
कल्याण डोंबिवलीमध्ये उद्या रविवारी 4 जुलै रोजी लसीकरण बंद राहणार आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेतर्फे ही माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे या आठवड्यात केवळ सोमवारी आणि आज म्हणजेच शनिवारी असे दोनच दिवस लसीकरण सुरू होते.
दरम्यान 4 दिवसांच्या विश्रांतीनंतर आज कल्याण डोंबिवलीत केवळ 5 ठिकाणी लसीकरण सुरू ठेवण्यात आले होते. मात्र शासनाकडून प्राप्त झालेल्या लसींचे प्रमाण अत्यल्प असल्याने कल्याण डोंबिवलीत केवळ 5 ठिकाणीच लसीकरण सुरू होते. शासनाकडून आलेला ‘लससाठा कमी आणि इच्छुक नागरिक त्यापेक्षा कितीतरी जास्त होते.
परिणामी कल्याणच्या लालचौकी आर्ट गॅलरी येथील लसीकरण केंद्रावर लसीकरण केंद्र कर्मचारी आणि नागरिकांकमध्ये शाब्दिक खटके उडाल्याचे दिसून आले. त्यातच परदेशी जाणाऱ्या व्यक्ती आणि इतर नागरिकांच्या लसीकरणाची वेळ एकच ठेवण्यात आल्याने या गोंधळात आणखीनच भर पडलेली पाहायला मिळाली. या केंद्रांवर देण्यात आलेला लसींचा साठा आणि इकडे उसळलेली गर्दी पाहता लोकांची समजूत काढता काढता इथल्या कर्मचाऱ्यांची चांगलीच दमछाक झाली. त्यातच कल्याण डोंबिवली महापालिकेकडून कोणत्याही प्रकारचे नियोजन नसल्याचा आरोप करत नागरिकांनी प्रशासनावर आगपाखड केलेली पाहायला मिळाली. परदेशी शिक्षणानिमित्त जाणारे विद्यार्थी आणि कामानिमित्त जाणारे नागरिक आणि त्याचसोबत इतर सामान्य नागरिक, ज्येष्ठ, वृद्ध नागरिक हे सर्वच जण एकाच वेळी लस घेण्यासाठी आल्याने इथल्या केंद्रावरील कर्मचाऱ्यांची चांगलीच तारेवरची कसरत झाली. मुळात कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनाने लसीकरणाचे नियोजन करताना परदेशी जाणाऱ्या नागरिकांसाठी वेगळा आणि सामान्य नागरिकांसाठी वेगळा वेळ राखून ठेवणे आवश्यक होते. मात्र तसे नियोजन न झाल्याने याठिकाणी काही काळ गोंधळाचे वातावरण होते.
याठिकाणी आलेल्या काही ज्येष्ठ नागरिकांनी केडीएमसी प्रशासनाने आमच्या लसीकरणाची स्वतंत्र व्यवस्था उपलब्ध करण्याची मागणी केली आहे. जेणेकरून आम्हाला तास न तास रांगेत उभे राहण्याचा त्रास सहन करावा लागणार नाही अशी अपेक्षा या नागरिकांनी व्यक्त केली.
Ok