कल्याण-डोंबिवली दि.4 मे :
कोवीड लसींच्या तुटवड्याचा परिणाम नागरिकांच्या लसीकरणावर होत असून कल्याण डोंबिवलीमध्ये गेल्या 4 दिवसांपासून 45 वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण ठप्प झाले आहे. त्यातच काही नागरिकांची 2ऱ्या डोसची तारीखही उलटून गेल्याने ते हवालदिल झाल्याचे चित्र दिसत आहे. तर आज किंवा उद्या केडीएमसीला शासनाकडून लसींचा साठा उपलब्ध होणार असून 44 वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण पुन्हा सूरु होणार असल्याची माहिती कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून एलएनएनला देण्यात आली आहे. (Vaccination of persons above 45 years of age is likely to start from tomorrow; Citizens are worried about the 2nd dose)
कल्याण डोंबिवलीमध्ये आतापर्यंत 44 वर्षांवरील 1 लाख 47 हजार 896 नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. त्यापैकी 1 लाख 22 हजार नागरिकांना पहिला तर त्यापैकी केवळ 25 हजार 354 नागरिकांना कोवीड लसीचा दुसरा डोस मिळाला आहे. त्यातच लसींचा नविन साठा उपलब्ध न झाल्याने गेल्या 4 दिवसांपासून केडीएमसीला नाईलाजास्तव 44 वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण पूर्णपणे बंद ठेवावे लागले आहे.
एकीकडे 44 वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण बंद असताना दुसरीकडे 1 मे पासून कल्याण डोंबिवलीत केवळ 18 ते 44 वयोगटाचे लसीकरण सुरू झाले आहे. परंतु 18 ते 44 वयोगटातील व्यक्तींचे हे लसीकरण राज्य शासनाकडून पाठवल्या जाणाऱ्या लसींमार्फत केले जाते. तर 44 वर्षांवरील नागरिकांचे केंद्र सरकारकडून केडीएमसीला दिल्या जाणाऱ्या लसीच्या साठ्यातून लसीकरण केले जाते. विशेष म्हणजे या दोन्हीकडून प्राप्त होणाऱ्या लसींची संख्या लोकसंख्येच्या मानाने अत्यंत तूटपुंजी ठरत आहे. परिणामी लस घेण्यासाठी इच्छुक जास्त आणि लस पुरवठा कमी अशीच काहीशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे.
गेल्या म्हणजे मार्च-एप्रिल महिन्यात कोरोनाचे आकडे वाढू लागल्यानंतर 44 वर्षांपेक्षा अधिक वयोगटातील अनेक जणांनी मोठ्या प्रमाणात रांगा लावून कोवीड लसीचा पहिला डोस घेतला. यातील अनेक जणांच्या दुसऱ्या डोसची तारीख मे महिन्यामध्ये येत आहे. तर अनेकांची दुसऱ्या डोसची तारीख उलटून गेल्याने आता पुढे काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. दुसरा डोस कधी मिळणार? कुठे मिळणार? वेळ उलटून गेली तर पुनः आम्हाला पुनः
2 डोस घ्यावे लागणार का? की केवळ दुसरा डोस घेतला तरी चालेल? असे असंख्य प्रश्न सध्या त्यांच्या मनात सतावत आहेत.
“आज-उद्याकडे केडीएमसीला लस प्राप्त होणार – डॉ. अश्विनी पाटील”
तर 44 वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणासाठी आज किंवा उद्या केडीएमसीला लसींचा साठा प्राप्त होणार आहे. त्यानंतर लगेचच त्यांचे लसीकरण सुरू केले जाणार असून दुसरा डोस असणाऱ्या नागरिकांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती केडीएमसीच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अश्विनी पाटील यांनी ‘एलएनएन’ला दिली. तर कोवीड लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर 4 ते 8 आठवड्यात दुसरा डोस घेता येऊ शकतो. मात्र नागरिकांनी शेवटच्या (8व्या) आठवड्यापर्यंत न थांबता शक्यतो 5 व्या आठवड्यातच दुसरा डोस घेण्याचे आवाहनही डॉ. पाटील यांनी यावेळी केले.
एकंदर परिस्थितीचा विचार करता केंद्र असो की राज्य सरकार, जोपर्यंत पुरेशा प्रमाणात लसींचा साठा उपलब्ध होत नाही तोपर्यंत हा गोंधळ काही केल्या संपणार नाही एवढे मात्र निश्चित आहे. त्यामुळे लवकरात लवकर अधिकाधिक लसींचा साठा उपलब्ध करून देणे हेच दोन्ही सरकारसमोर मोठे आवाहन आहे.