कल्याण-डोंबिवली दि.1 मे :
आजपासून 18 ते 44 वयोगटातील व्यक्तींच्या कोवीड लसीकरणाची राज्य शासनाने घोषणा केली होती. त्यानूसार केडीएमसीतर्फे कल्याणच्या आर्ट गॅलरी येथील लसीकरण केंद्र निश्चित करण्यात आले खरे. मात्र कोवीडचे डोस कमी आणि इच्छुक जास्त झाल्याने पहिल्याच दिवशी गडबड आणि गोंधळाचे वातावरण पाहायला मिळाले. तर कोवीन पोर्टलवर रजिस्ट्रेशनच होत नसल्याच्या असंख्य तक्रारी 18 ते 44 व्योगटांतील नागरिकांकडून केल्या जात आहेत.(The first day was confusing due to low doses and high inclinations)
राज्य शासनाने केलेल्या घोषणेनूसार आजपासून 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचे लसीकरण सुरू होणार होते. त्यानूसार आज प्रातिनिधिक स्वरूपात केवळ 200 जणानाच कोवीड लस दिली जाणार होती. कारण राज्य शासनाकडून केडीएमसीला तेवढेच डोस पाठवण्यात आले होते. त्यातच काल संध्याकाळी कोवीन पोर्टल ऍपवर रजिस्ट्रेशन करून स्लॉट बुक केलेल्या व्यक्तींनाच लस देणार असल्याचे केडीएमसीतर्फे सांगण्यात आले.
मात्र सकाळी आर्ट गॅलरी येथील केंद्रावरील कर्मचाऱ्यांकडून सरसकट सर्वानाच लसीसाठी टोकन वाटप करण्यात आले. त्यामुळे 12 च्या ठोक्याला या केंद्रावर लस घेण्यासाठी इच्छुक व्यक्तींची मोठी गर्दी झालेली पाहायला मिळाली. ‘आम्हाला टोकन दिले आहे, त्यामुळे आम्हालाच लस मिळाली पाहिजे’ असा आक्रमक पवित्रा उपस्थित व्यक्तींनी घेतला. त्यातच 44 वर्षांवरील व्यक्तीही लस घेण्यासाठी या केंद्रावर आल्या. त्यामुळे आता नेमका कोणा कोणाला ही लस द्यायची असा प्रश्न पालिका प्रशासनासमोर निर्माण झाला होता. लस द्यायची नव्हती तर मग आम्हाला टोकन वाटप का करण्यात आले असा संतप्त सवाल नागरिकांनी पालिका प्रशासनाला विचारला.
दरम्यान अखेर महापालिका आरोग्य अधिकारी डॉ. संदीप निंबाळकर यांनी उपस्थित व्यक्तींची समजूत काढण्याचा प्रयत्न करत स्लॉट देण्यात आलेल्या व्यक्तींनाच लस दिली जाईल असे स्पष्ट केले. तर पोलीस प्रशासनानेही यात हस्तक्षेप करत नागरिकांना वस्तुस्थिती स्पष्ट करत सहकार्य करण्याचे आवाहन केले. त्यानंतर कुठे हा गोंधळ शांत झाला आणि स्लॉट बुक झालेल्या व्यक्तींच्या कोवीड लसीकरणाला सुरुवात झाली. एकंदरीत 18 ते 44 वयोगटातील कोवीड लसीकरणाचा आजचा दिवस गोंधळ आणि गडबडीचा ठरलेला पाहायला मिळाले.