कल्याण दि.22 नोव्हेंबर :
कल्याणातील आंतरराष्ट्रीय कीर्तीचे कलातपस्वी शिल्पकार सदाशिव तथा भाऊ साठे यांचे काही महिन्यांपूर्वी निधन झाले. अशा या जागतिक किर्तीप्राप्त कलाकाराला श्रद्धांजली वाहण्यासाठी रविवारी कल्याणात संस्कार भारती कल्याण या संस्थेतर्फे ‘स्मरण शिल्प महर्षीचे’ ह्या श्रद्धांजलीपर विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कल्याणात अभिनव विद्या मंदिर येथे झालेल्या या कार्यक्रमात अनेक दिग्गज लोकांनी उपस्थित राहून भाऊंच्या आठवणी जाग्या केल्या. या कार्यक्रमाला प्रमूख पाहुणे म्हणून विख्यात चित्रकार सुहास बहुळकर उपस्थित होते. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ, कलाकार आणि कल्याण गायन समाजाचे अध्यक्ष डॉ. संदीप जाधव होते.
सुरवातीला भाऊंच्या शिल्पाला मान्यवरांनी पुष्पांजली अर्पण केल्यावर कै. भाऊ साठेंसह नुकतेच निधन झालेले शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनाही श्रद्धांजली वाहण्यात आली. प्रमुख पाहुणे ख्यातनाम चित्रकार सुहास बहुळकर यांनी दृकश्राव्य पद्धतीने भाऊंचा जीवनपट सर्वांपुढे उलगडून दाखविला.
संस्कार भारतीचे कोषाध्यक्ष सुधीर जोशी यांच्या प्रास्ताविकानंतर, आयबीएन लोकमतवर ‘ग्रेट भेट’ या कार्यक्रमात प्रसारित झालेली भाऊ साठेंची मुलाखत यावेळी दाखविण्यात आली. त्यानंतर भाऊंचा पुतण्या शिल्पकार सिद्धार्थ साठे यांनी भाऊंचे सुंदर असे शिल्प सर्वांसमोर उभे केले. तर कल्याण जनता सहकारी बँकेचे उपाध्यक्ष डॉ. रत्नाकर फाटक, संस्कार भारतीचे संघटक राजन जोशी यांच्यासह भाऊंचे चिरंजीव श्रीरंग साठे यांनीही आपल्या भावना यावेळी व्यक्त केल्या. तर अध्यक्षीय भाषणात डॉ. संदीप जाधव यांनी चित्रकार असलेले त्यांचे वडील आणि भाऊ साठे यांच्या आठवणी सांगितल्या. तर भाऊंची शिल्पे जतन करून ठेवलेल्या डोंबिवलीतील ‘शिल्पालयाचा’ परिचय करुन देणारी चित्रफित दाखवून या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
या कार्यक्रमाला अनेक चित्रकार, कलाकार, विविध संस्थांचे पदाधिकारी, प्राचार्य अशोक प्रधान, डॉ. सुरेश फडके यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राजक्ता कुलकर्णी यांनी केले.