राख्या मिठाई घेऊन बाईकवर करणार डोंबिवली ते कारगिल प्रवास
डोंबिवली दि .16 ऑगस्ट :
आपल्या जीवाची पर्वा न करता सीमेचे रक्षण करण्यासह देशात कुठेही काही नैसर्गिक आपत्ती किंवा समस्या आली तर धावून येतात ते सैनिक बांधव. अशा या शूर सैनिकांना मानवंदना देण्यासह त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी डोंबिवलीकर तरुण गेल्या दीड दशकांपासून एक राखी बंधनाची हा उपक्रम राबवत आहेत. आजच्या 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून त्याच्या डोंबिवली ते कारगिल प्रवासाला सुरुवात केली आहे.
वे टू कॉजचे संस्थापक रोहित आचरेकर हा डोंबिवलीकर तरुण गेल्या 17 वर्षांपासून हा उपक्रम राबवत आहे. तर गेल्या 5 वर्षापासून तो चक्क दुचाकीने डोंबिवली ते जम्मू काश्मीर असा प्रवास करत आहे. यंदा तब्बल 28 हजार राख्या आणि 750 किलो मिठाईचे त्याच्याकडून सैनिकांना वाटप केले जाणार आहे. इतकेच नव्हे तर थेट परदेशातूनही जम्मूमध्ये काही नागरिक राख्या पाठवणार असल्याची माहिती रोहित आचरेकरने दिली.
यासाठी राबविला जातो हा उपक्रम…
देशासाठी सैनिक आपले बलिदान देत असतात. देशाच्या नागरिकांसाठी ते घरापासून लांब राहतात. त्यांच्या बहिणीच्या राखीची ते आतुरतेने वाट पाहत असतात. देशावर कुठलेही मोठे संकट आले तर हेच सैनिक बांधव सर्वप्रथम मदतीसाठी धावून येतात. त्यांच्या या कार्याबाबत कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा उपक्रम सुरू केल्याचे रोहित म्हणाला.
याव्यतिरिक्त शाळेत असल्यापासून आपण सैनिकांसाठी पोस्टकार्ड पाठवत आहे. मात्र हे पोस्टकार्ड सैनिकांपर्यंत पोहचते का नाही याबाबत काहीसा साशंक व्हायचो. म्हणून मग स्वतः सैनिकांसाठी काहीतरी करावे अशी भावना निर्माण झाली आणि त्यातून या उप्रकमाची निर्मिती झाली.
तर रोहित आचरेकरसोबत वास्तुविशारद प्रेम देसाई आणि फायर फाईटर ससून गावडे हे त्याचे मित्रही या उपक्रमात सहभागी झाले आहेत.
असा असणार प्रवासाचा मार्ग…
हा प्रवास डोंबिवलीहून सुरत अहमदाबाद, जयपुर, उदयपूर, दिल्ली, हरियाणा ,पंजाब , या राज्यातून जवळपास 2 हजार 500 किलोमीटरचा असल्याचे रोहितने सांगितले.
या उपक्रमासाठी विविध राज्यातील रोटरी क्लबतर्फे आम्हाला राख्या देण्यात आल्या असून जवळपास 28 राज्यातून राख्या आणि मिठाई आतापर्यंत प्राप्त झाली आहे. प्रत्येक राज्यात आमची एक टीम असून गेल्या 20 दिवसापासून राख्या गोळा करण्याचे काम सुरू होते.