श्रीनगर दि.२१ जून :
श्रीनगर येथील जगप्रसिद्ध दाल सरोवराच्या काठावरील शेर-ए-काश्मीर इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर (एसकेआयसीसी) येथे झालेल्या योग प्रात्यक्षिक सोहळ्याचे नेतृत्व केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्याकडून करण्यात आले. या योग प्रात्यक्षिकात जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांनीही सहभाग घेतला.
स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष साजरे केले जात असताना, केंद्र सरकारने आजच्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून `ब्रँड इंडिया ॲट ग्लोबल स्टेज’वर लक्ष केंद्रीत केले आहे. देशातील ७५ प्रतिष्ठित ठिकाणी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. पंचायती राज विभागाच्या वतीने हरिद्वारमधील हर की पौडी व श्रीनगरमधील दाल सरोवर येथे मुख्य कार्यक्रम आयोजित केला होता. तर देशभरातील स्थानिक स्वराज्य संस्था व ग्रामपंचायतींतही योग दिन साजरा करण्यात आला.
दाल सरोवर येथे झालेल्या कार्यक्रमात जम्मू-काश्मीरातील पंचायती राज संस्थांचे लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.