नरेंद्र मोदींनी भारत कधीच जोडलाय तुम्ही आधी तुमची पार्टी जोडा असा टोलाही
डोंबिवली दि. ११ सप्टेंबर :
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सुरू केलेल्या भारत जोडो यात्रेमध्ये दिल्लीच्या जेएनयुमधील टुकडे टुकडे गँगचाही समावेश असल्याचा गंभीर आरोप केंद्रीय माहिती प्रसारण आणि क्रिडामंत्री अनुराग ठाकूर यांनी आज डोंबिवलीमध्ये केला. अनुराग ठाकूर हे आजपासून ३ दिवस कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर आले आहेत. त्यावेळी प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी हा आरोप करत राहुल गांधी यांच्या या यात्रेची खिल्लीही उडवली.
दिल्लीतील जे एन युमध्ये भारताचे टुकडे व्हावेत म्हणून काहीजण कल्पना आणि व्यूहरचना आखत होते. आणि याच टुकडे टुकडे गँगचे सदस्य राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेमध्ये सहभागी झाले असून त्यांना भेटण्यासाठी राहुल गांधी मध्यरात्री जात असल्याचा गंभीर आरोप केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी केला. तसेच नरेंद्र मोदी यांनी यापूर्वीच भारत जोडण्याचे काम केले आहे. त्यामुळे राहूल गांधी यांनी देश नव्हे तर आपला पक्ष जोडण्यकडे लक्ष द्यावे असे सांगत केंद्रीय मंत्री ठाकूर यांनी या भारत जोडो यात्रेची खिल्ली उडवली.
या पत्रकार परिषदेला अनुराग ठाकूर यांच्यासह केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, आमदार संजय केळकर, कुमार आयलानी, निरंजन डावखरे, माजी आमदार नरेंद्र पवार आदी भाजप नेतेही उपस्थित होते.