कल्याण दि. 7 सप्टेंबर :
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने महाराष्ट्रातील 16 जागांवर केंद्रीय मंत्र्यांचे दौरे आयोजित केले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून केंद्रीय माहिती प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर हे 3 दिवस कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर येत आहेत.
राज्यातील 16 लोकसभा क्षेत्रामध्ये विविध केंद्रीय मंत्री 3 दिवसाचा दौरा करणार आहेत. त्यानिमित्ताने केंद्रीय माहिती प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर कल्याण लोकसभेमध्ये 11, 12 आणि 13 सप्टेंबर अशा तीन दिवसांच्या दौऱ्यावर येत आहेत. या 3 दिवसांच्या दौऱ्यामध्ये ते पक्ष पदाधिकाऱ्यांच्या बैठकांसह विविध मान्यवरांच्याही भेटीगाठी घेणार आहेत. त्यासोबतच लोकसभा मतदारसंघातील शासकीय अधिकाऱ्यांच्या बैठकाही ते घेणार आहेत. दरम्यान कल्याण लोकसभा क्षेत्रामध्ये पक्ष संघटनेच्या वाढीकरता आणि लोकसभा मतदारसंघ मजबूत करण्याकरता केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्या या दौऱ्याला विशेष महत्व असल्याची प्रतिक्रिया कल्याण जिल्हा भाजपकडून व्यक्त करण्यात आली आहे.