Home ठळक बातम्या उल्हास नदी प्रदूषण : नदीचे पुनरुज्जीवन करण्यासाठी डीपीआर बनवण्याचे केडीएमसी आयुक्तांचे निर्देश

उल्हास नदी प्रदूषण : नदीचे पुनरुज्जीवन करण्यासाठी डीपीआर बनवण्याचे केडीएमसी आयुक्तांचे निर्देश

आयुक्त अभिनव गोयल यांच्याकडून उल्हास नदीसह नालेसफाईच्या कामांची पाहणी

कल्याण दि.22 एप्रिल :
गेल्या कित्येक वर्षांपासून चर्चेत असलेल्या उल्हास नदी प्रदूषणाच्या मुद्द्यावर अखेर केडीएमसी प्रशासनाने गांभीर्याने उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला आहे. कल्याण डोंबिवलीकरांची तहान भागवणाऱ्या या नदीचे पुनरुज्जीवन करण्यासाठी केडीएमसीकडून डीपीआर बनवण्याचे निर्देश केडीएमसीचे नविन आयुक्त अभिनव गोयल यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. (Ulhas River Pollution: KDMC Commissioner directs to prepare DPR to revive the river)

आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर अभिनव गोयल यांनी उल्हास नदीतील जलपर्णी काढण्याच्या कामासह परिसरातील प्रमूख नालेसफाईंच्या कामाची काल पाहणी केली. त्यावेळी उल्हास नदीतील प्रदूषण रोखण्यासाठी उपाय योजना करण्यासह कल्याण डोंबिवलीतील नालेसफाई तातडीनं सुरू करण्याचे निर्देशही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

उल्हास नदीमध्ये घरगुती सांडपाण्यासह औद्योगिक कंपन्यांचे केमिकलयुक्त पाणी कोणतीही प्रक्रिया न करता सोडले जात आहे. परिणामी जलपर्णी वाढण्यास हातभार लागून नदीही मोठ्या प्रमाणात प्रदूषित होत आहे.

या दृष्टीकोनातून उल्हास नदीचे पुनरुज्जीवन करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी यावेळी दिले. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून सध्या उल्हास नदीतील जलपर्णी काढण्याचे काम सुरू आहे. मोहने आणि गाळेगाव येथील उल्हास नदीला मिळणाऱ्या नाल्यांसह आयुक्तांनी या जलपर्णी काढण्याच्या कामाचीही पाहणी केली. उल्हास नदी पुनरुज्जीवनाबाबत पुढील उपाययोजना करण्याच्या दृष्टीने लवकरात लवकर डीपीआर तयार करुन तो शासनाच्या मंजुरीसाठी सादर करण्यात येईल असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

यानंतर “अ” प्रभागातील लहुजी नगर येथील रस्त्यावरील झोपडपट्टी,चाळीतील सांडपाणी व्यवस्थेची, अंबिकानगर येथील नालेसफाईच्या प्रस्तावित कामाची, “ब” प्रभागातील अनुपम नगर येथील नाला आणि चिकणघर नाल्याची त्यांनी अधिकाऱ्यांसमवेत पाहणी केली.

घनकचरा व्यवस्थापन योग्य प्रकारे सुरू राहण्याच्या आणि नाल्यामध्ये कमीत कमी कचरा जाण्याच्या दृष्टीने नालेसफाई ही डीप क्लिनिंग पद्धतीने करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिले.

यावेळी माजी नगरसेवक आणि उल्हास नदी प्रदूषणविरोधात सतत लढा देणारे मी कल्याणकर संस्थेचे प्रमुख नितीन निकम, अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे, शहर अभियंता अनिता परदेशी, उपायुक्त अतुल पाटील, प्रसाद बोरकर, संजय जाधव, कार्यकारी अभियंता घनश्याम नवांगुळ, शैलेश मळेकर, योगेश गोटेकर, 2/ब प्रभागाच्या सहा.आयुक्त प्रिती गाडे, 1/अ प्रभागाचे सहा.आयुक्त प्रमोद पाटील, मुख्य स्वच्छता अधिकारी वसंत देगलुरकर, इतर अधिकारी उपस्थित होते.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा