मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदेंच्या उपस्थितीत प्रवेश
उध्दव ठाकरे गटात भ्रमनिरास झाल्याची खंत केली व्यक्त
ठाणे दि.4 मे :
कल्याण लोकसभेत उध्दव ठाकरे गटाला पुन्हा एकदा झटका बसला आहे. उध्दव ठाकरे गटाचे कल्याण ग्रामीणमधील उपजिल्हाप्रमुख प्रकाश म्हात्रे आणि माजी नगरसेविका प्रेमा प्रकाश म्हात्रे यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्यांच्या ठाणे निवासस्थानी शिवसेनेत प्रवेश केला. दोन दिवसांपूर्वीच उध्दव ठाकरे गटाचे शहरप्रमुख विवेक खामकर, महिला जिल्हा संघटक कविता गावंड यांच्यासह शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. (uddhav-thackeray-groups-sub-district-chief-and-former-corporator-joins-shiv-sena)
उद्धव ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख प्रकाश म्हात्रे, माजी नगरसेविका प्रेमा प्रकाश म्हात्रे यांच्यासह केशव पाटील, शाखाप्रमुख परेश पाटील, उमेश सुर्वे, अशोक पाटील, विजय पाटील आणि अन्य कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. आपल्याला विश्वासात घेतले गेले नाही, आणि आपला भ्रमनिरास झाल्याची खंत यावेळी प्रकाश म्हात्रे यांनी व्यक्त केली. तसेच खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी गेल्या १० वर्षात कल्याण लोकसभेत विकासाची गंगा आणली असून आपण आता विकासापासून अलिप्त राहू शकत नसल्याचे ते म्हणाले. शिवसेनेत ४० वर्ष काम करूनही आपल्याला मातोश्रीवर कुणी ओळखत नाही. बाळासाहेब हयात होते, तोपर्यंत आमची श्रद्धा होती, पण आता आमचे मातोश्री हे ठाणेच आहे, अशी भावनाही यावेळी प्रकाश म्हात्रे यांनी व्यक्त केली.
तर या सर्वांना उध्दव ठाकरे गटात मिळालेली वागणूक या सर्वाला कारणीभूत असून दुसरीकडे राज्य सरकार आणि शिवसेना यांचे काम उत्तम सुरू आहे. विकास हाच आमचा अजेंडा आहे. त्यामुळे एका विश्वासाने लोक शिवसेनेत येत असल्याची प्रतिक्रिया यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
यावेळी कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, डोंबिवलीचे उपजिल्हाप्रमुख राजेश कदम, शहरप्रमुख राजेश मोरे, माजी नगरसेवक योगेश म्हात्रे, बंडू पाटील यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.