कल्याण दि. 20 जुलै :
कल्याण पूर्वेत आज सकाळी हल्ला झालेल्या शिवसेना पदाधिकारी हर्षवर्धन पालांडे यांना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी फोन करून विचारपूस केली. तसेच आपण लवकरच कल्याणात येणार असल्याचेही उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितले.
कल्याण पूर्वेतील संतोषी माता परिसरात आज सकाळी उपशहर प्रमुख हर्षवर्धन पालांडे काही कामानिमित्त जात होते. त्यावेळी तीन ते चार अज्ञात व्यक्तींनी आपल्यावर लोखंडी रॉड आणि धारदार शस्त्राने हल्ला केल्याची माहिती हर्षवर्धन पालांडे यांनी दिली. या हल्ल्यामध्ये पालांडे यांच्या हाताला दुखापत झाली आहे.
दरम्यान या घटनेची माहिती मिळताच शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज दुपारी हर्षवर्धन पालांडे यांना फोन करून घडलेल्या प्रकाराची माहिती घेतली. तसेच सध्या तुम्ही आराम करा, आपण लवकरच कल्याणात येणार असल्याचेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले.