(प्रातिनिधिक छायाचित्र)
डोंबिवली दि.11 जानेवारी :
डोंबिवलीमध्ये दोघा मित्रांचा मृत्यू झाला असून ताडीच्या अतिसेवनामुळे मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. मृत्यू झालेल्या तरुणांमध्ये एक जण डोंबिवली ट्रॅफिक पोलीस विभागात ट्रॅफिक वॉर्डन असून दोन महिन्यांपासून तो वैद्यकीय रजेवर होता. डोंबिवली पश्चिम कोपर परिसरात राहणारे सचिन पडमुख आणि स्वप्नील चोळके अशी या दोघांची नावे असून स्वप्निल हा डोंबिवली ट्रॅफिक पोलिसमध्ये वॉर्डन होता.
हे दोघेही काल संध्याकाळी आपल्या मित्रांसह कोपर गाव रेल्वे रुळालगत असणाऱ्या ताडी केंद्रावर गेले होते. ताडी पिऊन झाल्यावर रात्री 9 वाजण्याच्या सुमारास सचिन पडमुख आणि स्वप्नील चोळके घरी परतत असताना मधल्या रस्त्यात त्यांना त्रास जाणवू लागला. त्यामुळे सोबत असणाऱ्या त्यांच्या मित्रांनी दोघांनाही तत्काळ रुग्णालयात नेले. मात्र त्यापूर्वीच दोघांचाही मृत्यू झाल्याची माहिती विष्णूनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ भालेराव यांनी दिली. याप्रकरणी विष्णुनगर पोलिस ठाण्यात ताडी विक्रेत्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
दरम्यान या दोघांचा मृत्यू ताडीच्या अतिसेवनामुळे झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिल्याचे पोलिस निरीक्षक भालेराव यांनी सांगितले. तर सचिनच्या कुटुंबीयांनी संबंधित ताडी विक्रेत्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.