कल्याण डोंबिवली दि. १० ऑगस्ट :
कल्याण डोंबिवलीमध्ये स्वाईन फ्ल्यू मूळे दोघा जणांचा मृत्यू झाला असून २४ रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती केडीएमसी आरोग्य विभागातर्फे देण्यात आली आहे. स्वाईन फ्ल्यू ने मृत्यू झालेले दोन्ही रुग्ण सहव्याधीग्रस्त (ज्यांना आधीच इतर आजार होते) असून त्यापैकी एक पुरुष ( वय 85 वर्ष ) तर एक ५२ वर्षांची महिला असल्याची माहिती वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अश्विनी पाटील यांनी प्रसिध्दी माध्यमांना दिली आहे.
कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात 1 जून 2022 पासून स्वाईन फ्लूचे 48 रुग्ण आढळून आले होते. त्यापैकी 22 रुग्ण औषधोपचाराखाली असून 24 रुग्ण डिस्चार्ज झाले आहेत. स्वाईन फ्लूच्या वाढत्या रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर महापालिकेतर्फे जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे.
सर्दी खोकला असल्यास घ्या ही काळजी…
सर्दी, खोकला, घसादुखी, ताप अशी लक्षणे आढळून आल्यास नागरिकांनी स्वतःला अलगीकरण (आयसोलेट) करावे, गर्दीत जाऊ नये. तसेच मास्कचा वापर करावा आणि ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घेण्याचे आवाहन महापालिकेच्या वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अश्विनी पाटील यांनी केले आहे.
याठिकाणी मिळतेय स्वाईन फ्ल्यू ची लस…
महापालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालय, शास्त्रीनगर रुग्णालय तसेच कल्याण पश्चिमेतील वसंत व्हॅली येथे स्वाइन फ्लू लसीकरण केंद्र सुरू करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. ही लस दुसऱ्या आणि तिसऱ्या महिन्याच्या गरोदर महिला, उच्च रक्तदाब किंवा मधुमेह असणाऱ्या व्यक्ती, फ्ल्यू रुग्णांची तपासणी -देखभाल – सहभागी डॉक्टर्स, नर्सेस, आरोग्य कर्मचारी यांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच स्वाईन फ्ल्यू ची लस कोरोना लसीसोबत घेऊ नये. कोरोना लस आणि स्वाइन फ्लू लस यामध्ये किमान दोन आठवड्याचे अंतर असावे अशी माहितीही त्यांनी दिली आहे.
तसेच स्वाईन फ्ल्यू ची ही लस घेतल्यानंतर संबंधित व्यक्तीच्या शरीरात इन्फ्लुएंन्झाविरोधी प्रतिकारशक्ती निर्माण होण्यास किमान दोन आठवड्याचा कालावधी लागतो. आणि यामुळे मिळालेली प्रतिकारशक्ती ही जास्तीत जास्त एक वर्षापर्यंत टिकू शकते. त्यामुळे स्वाईन फ्ल्यू चे हे लसीकरण दरवर्षी घेणे आवश्यक असल्याचेही केडीएमसी आरोग्य विभागातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.