डोंबिवली रेल्वे स्टेशनच्या दोन्ही बाजूला साकारण्यात आलीय भित्तीचित्रं
डोंबिवली दि.12 ऑक्टोबर :
राज्याची सांस्कृतिक उपराजधानी अशी बिरुदावली मिळवलेल्या डोंबिवली शहराने आतापर्यंत अनेक उत्तमोत्तम कर्तृत्ववान नवरत्ने दिली आहेत. त्यांच्या कार्यकर्तृत्वाची जाणीव डोंबिवलीकरांच्या मनामध्ये सदैव राहण्याच्या उद्देशाने भित्तीचित्रांच्या (murals)माध्यमांतून त्यांना मानवंदना देण्यात आली आहे. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या संकल्पनेतून डोंबिवली स्टेशन परिसरात राबवण्यात आलेल्या या अनोख्या उपक्रमाचे दसऱ्याच्या पुर्वसंध्येला लोकार्पण करण्यात आले. (Tribute to accomplished Dombivlikars through murals; Concept of Minister Ravindra Chavan)
महाराष्ट्राची सांस्कृतिक उपराजधानी म्हणून डोंबिवली शहराची किर्ती आहेच. यासोबतच एक साहित्यनगरी, क्रीडा नगरी, उद्योग नगरी म्हणूनही अनेक डोंबिवलीकरांनी अथक मेहनतीद्वारे शहराची ही ओळख घडवली आहे. डोंबिवली शहराला सातासमुद्रापार घेऊन जाणारे हे डोंबिवलीकर इतरांसाठी आयडॉल असून डोंबिवलीची माती ही नवरत्नं घडवणारी असल्याचे गौरवोद्गार सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी या लोकार्पण सोहळ्यात काढले.
तसेच या सर्वां दिग्गजांच्या कर्तृत्वाची जाणीव डोंबिवलीकरांच्या मनात सदैव रहावी आणि डोंबिवलीकरांच्या पुढच्या पिढीला या सर्वांच्या कार्यातून प्रेरणा मिळावी. या उद्देशाने विविध क्षेत्रात नावलौकिक गाजवणाऱ्या, त्यांच्या क्षेत्रात प्रथम ठरलेल्या डोंबिवलीकरांचा गौरव म्हणून डोंबिवली रेल्वे स्टेशनच्या दोन्ही बाजूस सुशोभिकरण करून त्यांची भित्तिचित्रे लावण्यात आली आहेत.
शहराच्या विकासात योगदान देणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचा अशा रीतीने सन्मान करणारे आपले डोंबिवली शहर हे देशातील पहिले शहर ठरले आहे. जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यातून डोंबिवली शहरात येणाऱ्या प्रत्येकाला ही भित्तिचित्रे बघून आपल्या शहरात देखील अशाच नावीन्यपूर्ण गोष्टी निर्माण व्हाव्यात, असं नक्कीच वाटेल. आणि इतर शहरांमध्येही या संकल्पनेचे अनुकरण होईल असा विश्वास व्यक्त करत डोंबिवलीचा हा उज्ज्वल इतिहास आपण स्वतः जरूर पहावा, वाचावा आणि लोकांना सांगावा, असे आवाहनही चव्हाण यांनी यावेळी केले.
या कार्यक्रमाला भाजपचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र सुर्यवंशी, शशिकांत कांबळे, माजी विरोधी पक्षनेते मंदार हळबे, माजी नगरसेवक शैलेश धात्रक, विकास म्हात्रे, नंदू परब आदी भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.