Home ठळक बातम्या रस्त्यांवरील खड्डे भरण्यासाठी केडीएमसीकडून रॅपिड हार्डनिंग काँक्रिटचा प्रयोग

रस्त्यांवरील खड्डे भरण्यासाठी केडीएमसीकडून रॅपिड हार्डनिंग काँक्रिटचा प्रयोग

 

कल्याण डोंबिवली दि.२४ ऑगस्ट :
कल्याण डोंबिवलीतील रस्त्यांची खड्ड्यांमुळे झालेली दुरावस्था, अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेला गणेशोत्सव आणि याविरोधात नागरिकांसह लोकप्रतिनिधींमध्ये वाढता रोष या पार्श्वभुमीवर केडीएमसीकडून रस्त्यांवरील खड्डे भरण्यासाठी केडीएमसीकडून रॅपिड हार्डनिंग काँक्रिटचा प्रयोग करण्यात आला. मात्र या आधुनिक पद्धतीने खड्डे भरण्यासाठी लागणारा खर्च फारच मोठा असल्याने सध्या तरी पारंपरिक पद्धतीनेचे खड्डे भरणार असल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात आले.

कल्याण डोंबिवलीतील रस्त्यांच्या झालेल्या दुर्दशेवरून पुन्हा एकदा केडीएमसी प्रशासन निशाण्यावर आले आहे. गणेशोत्सवापूर्वी खड्डे भरण्याचे आश्वासन केडीएमसी आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी दिले असले तरी खड्डे भरण्यासाठी पाऊस अडथळा ठरत आहे. या पार्श्वभूमीवर पावसातही खड्डे भरता येतील अशा नविन आधुनिक पद्धतीची केडीएमसी आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी चाचणी घेतली. महापालिका क्षेत्रातील रस्त्यावरील खड्डे भरण्याची कामे गणेशोत्सवापूर्वी करावीत अशी मागणी सातत्याने नागरिकांकडून केली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त डॉ.भाऊसाहेब दांगडे आणि शहर अभियंता सपना कोळी देवनपल्ली यांनी डोंबिवलीतील 90 फुटी रस्त्यावर अल्ट्राटेक कंपनी मार्फत अत्याधुनिक पध्दतीने खड्डे भरण्याच्या प्रात्यक्षिकाची पाहणी केली.

काय आहे ही रॅपिड हार्डनिंग काँक्रिट पद्धत…?
रस्त्यावर पडलेले खड्डे आणखी खोदून त्यात सिमेंट, खडी यासह विविध प्रकारचे ॲडेसीव्ह मिसळून तयार केलेल्या मिश्रणाचा थर दिला जातो. जिथे सामान्य कॉंक्रीट सेट होण्यासाठी ४ ते ५ तासाचा कालावधी लागतो तिथे या रपिड कॉंक्रीटचे मिश्रण खड्ड्यात पडल्यानंतर ४० मिनिटात सेट होते. तर ४ ते ५ तासात त्यावरून वाहतूक सुरु करणे शक्य होत असल्याचा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे. .या रॅपिड कॉंक्रीटचा पहिला प्रयोग केडीएमसीच्या ९० फुटी समांतर रस्त्यावर करण्यात आला आहे. हा प्रयोग यशस्वी ठरल्यास शहरात या पद्धतीने खड्डे भरले जाणार असल्याचे पालिका आयुक्त डॉ भाऊसाहेब दांगडे यांनी सांगितले.

 


यावेळी डोंबिवलीतील बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता रोहिणी लोकरे, उपअभियंता सुनिल वैद्य, शैलेश मळेकर , माहिती जनसंपर्क अधिकारी माधवी पोफळे, जे प्रभागाच्या सहा.आयुक्त हेमा मुंबरकर आणि इतर अधिकारी, अभियंते उपस्थित होते.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा