डोंबिवली दि.23 ऑगस्ट :
लोकल गाड्या वेळेवर चालवा, जादा फेऱ्या सोडा, ठाणे कर्जत- कसारा शटल सेवा द्या, महिला विशेष लोकल सोडा या मागणीसाठी उपनगरी रेल्वे प्रवासी महासंघाच्या मार्गदर्शनाखाली डोंबिवलीत विविध प्रवासी संघटनांनी गुरुवारी काळी फित आणि पांढरा शर्ट, कुर्ता घालून प्रवास अभियान राबवले. ज्याला दहा हजारांहून अधिक प्रवाशांनी उदंड प्रतिसाद देऊन पाठिंबा दिला. विशेषतः युवा वर्ग, महिला, दिव्यांग बांधवांनी स्वतःहून पुढे येत सहकार्य केले. रेल्वेचा निषेध नव्हे तर “आता तरी जागे व्हा” या टॅग लाईनखाली संघटनांनी काळी फित बांधून रेल्वेप्रवास केला. सर्वाधिक गर्दीचे बळी हे डोंबिवलीचे आहेत. त्यासाठी जनजागृती करण्याच्या हेतूने हा उपक्रम हाती घेण्यात आला होता. आबालवृद्ध नागरिक त्यात काळी फित बांधण्यासाठी पुढे आले होते. (Train journey of 10 thousand passengers wearing black ribbons in Dombivli for various demands)
मुंबई महानगर प्रदेशातील लोकल प्रवासी आपला मृत्यू पाठीशी घेऊनच लोकल प्रवास करीत आहे. मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील प्रचंड गर्दीमुळे धावत्या लोकलमधून पडून बळी गेलेल्या प्रवाशांची लोहमार्ग पोलिसांकडील अधिकृत आकडेवारी पाहिली तरी हे ज्वलंत वास्तव लक्षात येते. दीर्घकाळ रखडलेले पायाभूत सुविधा प्रकल्प, प्रवाशांच्या तुलनेत न वाढणार्या लोकल फेर्या, मेल एक्स्प्रेस माल गाड्या यांना प्राधान्य देऊन ऐन गर्दीच्या वेळेतच सातत्याने लोकल उशिराने चालविणे, मा.मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार कार्यवाही न करणे, साध्या लोकल एवजी वातानुकूलित लोकल चालविणे,सातत्याने लोकल सेवा विस्कळीत होणे या घटनांमुळे लोकल प्रवासी प्रचंड त्रस्त झाले आहेत. या सर्व मुद्द्यांचा पाठपुरावा, पत्रव्यवहार आणि प्रत्यक्ष बैठका रेल्वे प्रशासनासोबत सुरू आहेतच. मात्र रेल्वे प्रशासन या सर्वच मागण्यांबाबत हतबलता व्यक्त करीत असल्याचे रेल्वे प्रवासी संघटनेतर्फे सांगण्यात आले. Ac लोकल चालविण्याचा आग्रह धरणाऱ्या मध्य रेल्वे प्रशासनाने मागील दहा वर्षात सीएसएमटी तर दूर साधी ठाणे स्थानकातून कर्जत -कसारा मार्गावर एकही लोकल फेरी वाढविलेली नाही. सुखद सुरक्षित आणि संरक्षित रेल्वे प्रवास हा लोकल प्रवाशांचा अधिकार नाही का? असा संतप्त सवालही प्रवासी संघटनेकडून करण्यात आला.
मागील अनेक वर्षे सुरू असलेल्या रेल्वेच्या या प्रशासकीय अनास्थेविरुद्ध मुंबई रेल प्रवासी संघाच्या आवाहनानुसार एमएमआरमधील लोकल प्रवशांनी 22 ऑगस्ट रोजी पांढरे कपडे आणि काळी फित लावून प्रवास केला.अत्यंत शांततेच्या वातावरणात हे अभियान संपन्न झाले. यावेळी महासंघ अध्यक्ष लता अरगडे, उपाध्यक्ष अनिकेत घमंडी, कौस्तुभ देशपांडे, रेखा देढिया, तन्मय नवरे, शशांक खेर, सागर घोणे आदींसह संघटनांचे महिला, पुरुष पदाधिकारी उपक्रमात सहभागी झाले होते.