Home ठळक बातम्या वाहतूक कोंडीची समस्या हाताबाहेर : प्रशासकीय यंत्रणा मात्र कुंभकर्णाच्या झोपेमध्ये

वाहतूक कोंडीची समस्या हाताबाहेर : प्रशासकीय यंत्रणा मात्र कुंभकर्णाच्या झोपेमध्ये

वाहतूक कोंडीची समस्या हाताबाहेर : प्रशासकीय यंत्रणा मात्र कुंभकर्णाच्या झोपमध्ये

केतन बेटावदकर
कल्याण दि.13 जुलै :

कल्याण शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न प्रशासनाच्या हाताबाहेर गेला आहे की काय असे वाटण्याजोगी भूषण परिस्थिती आज दुपारपासून निर्माण झाली होती कल्याणातील प्रत्येक प्रमुख रस्ता आणि चौक आज ट्राफिक जाममुळे ठप्प पडल्याचे दिसून आले. ज्यामध्ये अनेक रुग्णवाहिका आणि शाळेच्या बसेस अडकून पडल्या होत्या. (Traffic congestion problem out of hand: Administrative system but in Kumbhakarna’s sleep)

सिग्नल यंत्रणा ठरली अपयशी…
आज सकाळपासूनच आणि परिसरात कल्याण शहर आणि परिसरात पावसाने चांगलाच जोर धरला आहे त्यामुळे काही अल्हाददायक वातावरण निर्माण झाले असताना शहरात झालेल्या वाहतूक कोंडीने त्यामध्ये अक्षरशा मिठाचा खडा टाकण्याचे काम केले कल्याण पश्चिम येतील सर्वच प्रमुख रस्ते आज वाहनांच्या गर्दीने फुलून गेले होते. वाहनांची ही गर्दी इतकी होती शहरात काही ठिकाणी लावलेल्या सिग्नल यंत्रणेलाही त्यांना नियंत्रणात ठेवण्यात अपयशी ठरली.

अनेक रुग्णवाहिका अडकून पडल्या…
जुने कल्याण समजले जाणारे आग्रा रोड, सहजानंद चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, गुरुदेव हॉटेल ते नवीन कल्याणाची ओळख असलेल्या दुर्गाडी चौक, वाडेघर चौक, आधारवाडी चौक, खडकपाडा सर्कल या प्रमुख मार्ग आणि चौकांमध्ये भयंकर अशी वाहतूक कोंडी झाली होती. ज्यामध्ये अनेक रुग्णवाहिका अडकून पडल्या होत्या.

रेल्वे स्टेशन परिसरातील या नरकयातना
ही शहराच्या प्रमुख रस्ते आणि चौकांची अवस्था असताना कल्याण स्टेशन परिसर त्यामध्ये मागे कसा राहील. या परिसरात तर आगीतून फुफाट्यात या म्हणीप्रमाणे दारुण अशी परिस्थिती निर्माण झाली होती. या ठिकाणी सुरू असलेल्या सॅटिसच्या कामामुळे आधीच इथली वाहतुकीची समस्या म्हणजे डोक्याला ताप झाली आहे त्यात आज कोसळलेल्या मुसळधार पावसाने आगीमध्ये तेल ओतण्याचे काम केले. केवळ आणि केवळ नाईलाज म्हणून कल्याणकरांना रेल्वे स्टेशन परिसरातील या नरकयातना भोगाव्या लागत आहेत.

शहराचा श्वास कोंडण्याइतकी आणि जीव गुदमरण्याइतकी परिस्थिती
नाही म्हणायला शहरातील दळणवळण सुस्थितीत राखण्यासाठी वाहतूक पोलीस आणि कल्याण डोंबिवली महापालिकेसारख्या प्रशासकीय यंत्रणांची निर्मिती करण्यात आली आहे. मात्र गेल्या काही वर्षातील कल्याण शहराची वाटचाल पाहता या प्रशासकीय यंत्रणा आणि त्यामध्ये काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना या शहराप्रती किती आत्मीयता आहे हे या समस्येवरून ठळकपणे दिसून येत आहे. अन्यथा शहराचा श्वास कोंडण्याइतकी आणि जीव गुदमरण्याइतकी परिस्थिती निर्माण होऊनही प्रशासनाला त्याबाबत काहीही सोयर सुतक वाटू नये यापेक्षा दुर्दैव ते आणखी काय म्हणावे?

प्रश्न प्रशासकीय यंत्रणांच्या हाताबाहेर…
शहरामध्ये अस्तित्वात असलेल्या प्रशासकीय यंत्रणांचे अपयश आणि त्यांची उदासीनता यामुळे निर्माण होणाऱ्या अडचणींचे खापर दरवर्षी पावसावर फोडले जाते. आणि इतर दिवसांप्रमाणे पावसाळ्याचे दिवसही कसे बसेल ढकलले जातात. परंतु आजची परिस्थिती पाहता कल्याण शहरातील वाहतूक कोंडीची समस्या आणि त्याच्या नियंत्रणाचा प्रश्न हा प्रशासकीय यंत्रणांच्या हाताबाहेर गेल्याचेच दिसून येत आहे.

निरपराधांचा बळी जात नाही,तोपर्यंत यंत्रणा जागी होणार नाही…
ही यंत्रणा सध्या तरी कुंभकर्णाच्या झोपेमध्ये असून किंबहुना झोपेचे खोटे सोंग घेतले असून जोपर्यंत निरपराधांचा बळी जात नाही, तोपर्यंत ही यंत्रणा जागी होणार नाही हा आजवरचा अनुभव आणि कटू सत्य आहे. जे कोणीही नाकारू शकत नाही.

– केतन बेटावदकर

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा